🔥हाच तो रायटर गुणंवत बोईनवाड अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपीना सोडले मोकाट
🔥आर्णी पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीच झाले वरचढ
🔥ठाणेदाराच्या ‘राईटर’ गुणंवत बोईनवाड ने ५ लाखात गुन्हा दडपला ; लॉज चालकाला धमकावल्याची चर्चा, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे फौजदारी कारवाईची मागणी
यवतमाळ-/ लोनबेहळ येथील एका तरुणीवरील अत्याचार प्रकरणाला महिना उलटूनही आर्णी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक न केल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आर्णी पोलीस ठाण्यातील ठाणेदाराचा वादग्रस्त ‘राईटर’ पोलीस कर्मचारी गुणवंत बोईनवाड याने आरोपीकडून ५ लाखांची लाच उकळून त्याला मोकाट फिरण्याची मुभा दिल्याचा खळबळजनक आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या गंभीर प्रकरणामुळे यवतमाळ पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर आणि खाकी वर्दीच्या निष्ठेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोनबेहळ गावातील एका तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात भादंविच्या संबंधित कलमान्वये महिनाभरापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, इतका प्रदीर्घ काळ लोटूनही तपास यंत्रणेला आरोपीचा थांगपत्ता लागलेला नाही. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस आरोपीच्या मागावर असल्याचा आव आणत आहेत, मात्र प्रत्यक्षात आरोपीला वाचवण्यासाठीच यंत्रणा राबत असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. अत्याचारासारख्या संवेदनशील गुन्ह्यात महिनाभर कारवाई न होणे ही पोलिसांची अक्षम्य बेपर्वाई असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणात आर्णी पोलीस ठाण्यातील ठाणेदाराचा निकटवर्तीय मानला जाणारा राईटर गुणवंत बोईनवाड याची भूमिका सर्वाधिक संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर बोईनवाड याने मध्यस्थी करत आरोपी पक्षाकडून तब्बल ५ लाख रुपयांची लाच स्वीकारली. केवळ लाच घेऊनच तो थांबला नाही, तर आरोपीला न्यायालयातून सहज जामीन कसा मिळेल, यासाठी पळवाटा शोधण्याचा प्रयत्नही या कर्मचाऱ्याकडून सुरू असल्याची चर्चा आहे.
पीडितेवर लोनबेहळ येथील ज्या लॉजवर वारंवार अत्याचार करण्यात आला, त्या गुन्ह्याच्या मुख्य ठिकाणाचा पुरावाच नष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राईटर बोईनवाड याने संबंधित लॉज चालकाला ‘आरोपी व पीडिता इथे कधी आलेच नाहीत, असे पोलिसांना सांगा’ अशी थेट धमकी दिल्याचे समजते. इतकेच नव्हे, तर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यालाही अडचणीत आणून, आरोपीच्या अटकेत सतत खोडा घालण्याचे काम हा राईटर करत असल्याचे बोलले जात आहे. गुन्हेगाराला आवश्यक ती सर्व रसद ठाण्यात बसून पुरवली जात असल्याने आरोपी पोलिसांच्या डोळ्यांसमोरून सहज चकवा देत आहे.आर्णी पोलीस ठाण्यात ठाणेदार खंडारे यांच्या कार्यकाळात नेमके कोणाचे नियंत्रण आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ठाणेदारांचा राईटर थेट गुन्हेगारांशी आर्थिक तडजोडी करत असेल, तर कायद्याचे रक्षण कसे होणार? आरोपीला अटक का केली जात नाही? मोबाईल लोकेशन किंवा इतर तांत्रिक पुरावे असताना महिनाभर आरोपी पसार कसा राहू शकतो? पीडित कुटुंबीयांनी केलेल्या लाचेच्या गंभीर आरोपांची अद्याप अंतर्गत चौकशी का झाली नाही? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आता पोलीस प्रशासनाला विचारले जात आहेत. आर्णी पोलिसांच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात पीडित कुटुंबीयांनी अखेर यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली आहे. स्थानिक पोलिसांवरचा विश्वास उडाल्याने या प्रकरणाची थेट वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गुन्ह्यातील फरार आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, पीडितेला सुरक्षा पुरवावी, तसेच गुन्हेगाराशी ‘सेटिंग’ लावून खाकीला कलंकित करणारा राईटर गुणवंत बोईनवाड आणि या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करणारे ठाणेदार खंडारे यांच्यावर तात्काळ निलंबनाची आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासह फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी पीडित कुटुंबीय व लोनबेहळ ग्रामस्थांनी केली आहे. अत्याचारासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यात पोलीसच रक्षक न राहता भक्षकांच्या पाठीशी उभे राहत असल्याचा आरोप होत असल्याने आर्णी परिसरात प्रचंड असंतोष खदखदत आहे. वरिष्ठ पातळीवरून यावर त्वरित कठोर पावले उचलली गेली नाहीत, तर पोलीस ठाण्यासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. आता पोलीस अधीक्षक कुमार चिंता या प्रकरणात काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)