🔥चिरतरुण पत्रकार हरपला; अनुपकुमार भार्गव यांचे दुःखद निधन
पुलगाव /- व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या साप्ताहिक विंगचे विदर्भ अध्यक्ष तथा साप्ताहिक पुलगाव टाइम्सचे संपादक अनुपकुमारजी भार्गव यांचे रविवारी दुपारी २.३० वाजता नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वर्धा जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रासह व्हॉईस ऑफ मीडिया परिवारावर शोककळा पसरली आहे.
वयाची ६८ वर्षे पूर्ण केली असली तरी भार्गवजी हे पत्रकारितेच्या क्षेत्रात अखेरपर्यंत चिरतरुण राहिले. पत्रकारितेची ओढ आणि संघटनेप्रती असलेली निष्ठा त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवत होती. प्रेस कॉन्फरन्स असो अथवा संघटनेचा कोणताही कार्यक्रम, आपली उपस्थिती आवर्जून नोंदविण्यासाठी ते सदैव तत्पर असायचे.कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था असो वा नसो, त्याची पर्वा न करता एसटी महामंडळाची बस किंवा रेल्वेने प्रवास करून ते नियोजित स्थळी पोहोचायचे. पत्रकारिता आणि पत्रकारांच्या संघटनात्मक प्रश्नांबाबत त्यांची असलेली तळमळ त्यांच्या या प्रवासातून प्रकर्षाने दिसून यायची.व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या बांधणीतही भार्गव यांचे मोलाचे योगदान राहिले. संघटनेचा विस्तार आणि पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आपल्या प्रेमळ, मनमिळावू आणि हरहुन्नरी स्वभावामुळे ते पत्रकारिता क्षेत्रातील प्रत्येकाच्या परिचयाचे झाले होते. वयाने ज्येष्ठ असूनही सहकाऱ्यांमध्ये ते कायम उत्साहाने वावरत असत.त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने वर्धा जिल्ह्यातील व्हॉइस ऑफ मीडिया परिवाराने एक कर्तव्यनिष्ठ, जिद्दी आणि प्रेमळ सहकारी गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची आणि संघटनात्मक कार्याची आठवण कायम स्मरणात राहील.
व्हॉइस ऑफ मीडिया परिवारासह वर्धा जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्राच्या वतीने अनुपकुमारजी भार्गव यांना साहसिक संघटना व news-24 कडून भावपूर्ण श्रद्धांजली.! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.