दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठातील नवनियुक्ती     डॉ. ललित वाघमारे कुलगुरूपदी तर डॉ. गौरव मिश्रा प्रकुलगुरू

0

साहसिक न्यूज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा :
सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. ललितभूषण वाघमारे तर प्रकुलगुरू पदावर डॉ. गौरव मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आल्याची अधिकृत घोषणा अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डाॅ. वेदप्रकाश मिश्रा यांनी पत्रपरिषदेत केली. विद्यापीठाच्या सभाकक्षात आयोजित या पत्रपरिषदेला कुलपती दत्ता मेघे प्रामुख्याने उपस्थित होते. आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या पूर्वकुलगुरुंचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने देशभरातून कुलगुरू पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यात देशातील सात विद्यापीठांच्या पदाधिकाऱ्यांसह २७ मान्यवरांचे अर्ज प्राप्त झालेत. त्यातून कुलगुरू पदासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी देशपातळीवर एक समिती गठीत करण्यात आली. या समितीने दिलेल्या अहवालानुसार आणि कुलपती दत्ता मेघे यांच्या अनुमतीने विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. ललित वाघमारे यांची रीतसर नियुक्ती करण्यात आली, असे यावेळी डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी सांगितले. या नियुक्तीनंतर लगेच व्यवस्थापन मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली व या बैठकीत नवनियुक्त कुलगुरू डॉ. वाघमारे यांनी आपल्या अधिकारांतर्गत डॉ. गौरव मिश्रा यांची प्रकुलगुरू पदावर नियुक्ती केली, असेही प्रकुलपती डाॅ. मिश्रा यांनी सांगितले. पत्रपरिषदेला  कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसुळकर, विशेष कार्य अधिकारी डाॅ. अभ्युदय मेघे, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर यांची उपस्थिती होती. 
डॉ. ललितभूषण वाघमारे हे शरीरक्रियाशास्त्र विभागात कार्यरत असून यापूर्वी मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे. कमी वयात विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त करून देणारे डॉ. वाघमारे यांनी मेघे अभिमत विद्यापीठ तसेच कराड येथील कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या समितीमध्ये शिक्षणतज्ज्ञ म्हणून योगदान दिले आहे. तर, डॉ. गौरव मिश्रा क्ष किरण विभागात कार्यरत असून रेडिओडायग्नोसिस आणि हेल्थ प्रोफेशन्स एज्युकेशन या विषयांमध्ये अल्पावधीत सलग दोनदा त्यांनी आचार्य पदवी प्राप्त केली आहे. सद्यस्थितीत डॉ. गौरव मिश्रा देशातील सर्वात तरूण प्रकुलगुरू आहेत.   

डॉ. ललित वाघमारे पाचवे कुलगुरू

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू म्हणून डॉ. ललित वाघमारे रुजू झाले असून यापूर्वी डाॅ. वेदप्रकाश मिश्रा, डाॅ. अनिल पटवर्धन, डाॅ. दिलीप गोडे व डाॅ. राजीव बोरले यांनी कुलगुरू पदाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. पूर्वसुरींची सन्मान्य परंपरा सांभाळत आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही स्तरावर आयुर्विज्ञान संस्थेचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविण्यास सतत प्रयत्नशील राहू, असे डॉ. वाघमारे यावेळी म्हणाले. त्यासोबतच, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात इंग्रजी भाषेचा अडसर राहू नये म्हणून राष्ट्रभाषेसोबतच मातृभाषा मराठीतही अनेक अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचा संकल्प डॉ. ललित वाघमारे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. आगामी काळात विद्यापीठातील विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या प्रतिवर्षी दहा हजार असेल आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण घेतानाच अर्थार्जन आणि पदवी प्राप्त केल्यावर नोकरीची संधीही उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!