पत्रकारांच्या एस.टी. प्रवास सवलतीवर गदा; ‘व्हॉईस ऑफ मीडिया आंदोलनाच्या तयारीत

0

🔥पत्रकारांच्या एस.टी. प्रवास सवलतीवर गदा;
‘व्हॉईस ऑफ मीडिया आंदोलनाच्या तयारीत

मुंबई -/ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एस.टी.च्या तिकीट मशीनमधून अधिस्वीकृतिधारक पत्रकारांसाठी असलेला प्रवास सवलतीचा पर्याय बंद करण्यात आल्याने राज्यातील पत्रकार बांधवांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पत्रकारांसाठी पर्यायी राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड मिळण्यास जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागणार असताना, तोपर्यंत पत्रकारांनी पूर्ण तिकीट काढून प्रवास करायचा का, असा थेट आणि धारदार सवाल व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम आंतरराष्ट्रीय फोरमने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना केला आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम आंतरराष्ट्रीय फोरमच्या वतीने या संदर्भात स्वतंत्र निवेदने देण्यात आली असून, एस.टी.च्या सर्व तिकीट मशीनमधील अधिस्वीकृतिधारक पत्रकारांचा सवलतीचा पर्याय तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. सध्या विविध प्रवर्गांसाठी राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. मात्र, पत्रकारांना हे कार्ड तातडीने उपलब्ध होणार नसल्याची परिस्थिती आहे. कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू होण्यासाठी सुमारे १५ दिवसांचा कालावधी लागणार असून, त्यानंतर कार्ड प्रत्यक्ष मिळण्यासाठी आणखी सुमारे ४५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच जवळपास दोन महिने पत्रकारांकडे पर्यायी कार्ड उपलब्ध होणार नाही.

याच पार्श्वभूमीवर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम आंतरराष्ट्रीय फोरमने प्रशासनाला थेट सवाल केला आहे की, “कार्ड मिळायला दोन महिने लागणार असतील, तर त्या दोन महिन्यांत अधिस्वीकृतिधारक पत्रकारांनी पूर्ण तिकीट काढून प्रवास करायचा का?” एकीकडे एस.टी.च्या तिकीट मशीनमधून पत्रकारांचा सवलतीचा पर्याय बंद करण्यात आला आहे, तर दुसरीकडे पर्यायी कार्ड मिळण्यासाठी जवळपास दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे पत्रकारांना प्रत्यक्षात प्रवास सवलतीपासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार असल्याची तीव्र भावना पत्रकारांमधून व्यक्त होत आहे.

पत्रकारांना बातम्यांचे संकलन, अपघात, नैसर्गिक आपत्ती, सामाजिक प्रश्न, शासनाच्या योजना आणि जनतेच्या समस्या यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात सातत्याने प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत पत्रकारांसाठी एस.टी. ही अत्यंत महत्त्वाची प्रवास व्यवस्था आहे. अनेक पत्रकार मर्यादित आर्थिक परिस्थितीतही जनतेचा आवाज शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार टाकणे अन्यायकारक असल्याचे व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम आंतरराष्ट्रीय फोरम म्हटले आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम आंतरराष्ट्रीय फोरमने स्पष्ट मागणी केली आहे की, जोपर्यंत प्रत्येक पात्र अधिस्वीकृतिधारक पत्रकाराला राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड प्रत्यक्ष मिळत नाही, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे एस.टी.च्या तिकीट मशीनमधील पत्रकारांचा सवलतीचा पर्याय सुरू ठेवण्यात यावा. पात्र पत्रकारांना प्राधान्याने आणि जलदगतीने कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे तसेच पत्रकारांच्या प्रवास सवलतीबाबत राज्यातील सर्व आगार, डेपो, विभागीय कार्यालये आणि वाहकांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. या प्रश्नावर पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींशी तातडीने बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनात आणखी एक महत्त्वाची मागणी करण्यात आली असून, अधिस्वीकृतिधारक पत्रकारांचा प्रवास पास केवळ सर्वसाधारण एस.टी. बसपुरता मर्यादित न ठेवता शिवाई बस तसेच विद्युत बस सेवेतही लागू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आजच्या काळात महामंडळाकडून आधुनिक आणि जलद प्रवासासाठी शिवाई व विद्युत बस सेवा मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहे. पत्रकारांना अनेकदा तातडीच्या बातम्यांसाठी आणि विविध कामांच्या निमित्ताने जलद प्रवास करावा लागतो. त्यामुळे पत्रकारांचा पास केवळ काही विशिष्ट बस सेवांपुरता मर्यादित ठेवणे योग्य नसून, शिवाई आणि विद्युत बससारख्या आधुनिक बस सेवांमध्येही पत्रकारांना समान सुविधा मिळणे आवश्यक असल्याची भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम आंतरराष्ट्रीय फोरमने घेतली आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम आंतरराष्ट्रीय फोरमने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, पत्रकारांचा सवलतीचा पर्याय तात्काळ पूर्ववत करण्यात आला नाही आणि पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रसंगी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संबंधित कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

“कार्ड द्या; पण तोपर्यंत पत्रकारांची प्रवास सवलत बंद करू नका. पत्रकारांना न्याय द्या, अन्यथा आंदोलन अटळ आहे,” अशी ठाम भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम आंतरराष्ट्रीय फोरमने घेतली आहे.

या निवेदनावर मा. संदीप काळे, संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष; मा. अनिल म्हस्के, राष्ट्रीय अध्यक्ष आणि मा. विजय चोरडिया, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या असून, राज्यातील पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना संघर्ष करण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

                ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 मुंबई 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!