प्रवासी घेऊन जाणारा ऑटो रोड दुभाजकावर चढल्याने एकाचा मृत्यू,एक जखमी
प्रतिनिधी/ वर्धा :
भरधाव ऑटो अनियंत्रीत होउन पलटला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जखमी झाला. ही घटना शुक्रावारी (ता. चार) सायंकाळी ३.३० वाजताच्या सुमारास बोरगाव ग्रामपंचायत समोर घडली. कुंदन शालिक थूल (वय ४०) रा. वाफगाव ता. देवळी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार कुंदन थूल हा बोरगाव टेकडी येथे जाण्यासाठी बजाज चौक येथून संदीप रामदास लोहकरे यांच्या ऑटोत बसला होता. लोहकरे यांनी आपल्या ताब्यातील ऑटो भरधाव वेगात चालवून बोरगाव ग्रामपंचायत परिसरात असलेल्या डीवायडरला धडक दिली. या अपघातात कुंदन डिवायर व ऑटोच्या मध्ये दबल्या गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ऑटो चालक संदीप लोहकरे हा गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी ऑटो चालक संदीप लोहकरे याच्या विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.