हिंगणघाट /यवतमाळ जिल्ह्यातील मजूर म्हणून ट्रॅक्टरवर कामासाठी शहरात आलेल्या तीन आरोपींनी त्यांच्यासोबत कामावर असलेल्या तुकाराम नामदेव कासारे या मित्राचा लाठीने प्रहार करून काल रात्री खून केला.
सदर घटना काल रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली.
काल सोमवारी कामाचा पगार मिळाल्याने या कामगार मित्रांनी दारु, मटणाचे पार्टीचा बेत आखला होता, यात मटणावरुन त्यांचा वाद झाला, हा वाद विकोपाला गेल्यावर ३ आरोपींनी मृतकाला लाठ्याकाठ्याने प्रहार करीत गंभीर जखमी केले. यातच तुकाराम कासारे याचा घटणास्थळी मृत्यु झाला.
घटनेतील आरोपी पांडुरंग बापूनजी परसोडे वय ४२ रा. गोधनी, विजय दावलू मदनकर वय ४० रा. येरद, दिलिप अनंत दांडेकर वय १९ रा. गोधनी सर्व जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी आहेत.घटनेची माहिती या परिसरातून एका नागरिकाने फोनवरून पोलिसांना दिली, पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पळून जाण्याचे प्रयत्नात असलेल्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.
स्थानिक न्यायालयाने आरोपींना पुढील १६ मे पर्यंत पोलिस रिमांड मंजूर केला.