🔥यवतमाळात विषारी दारूचे साम्राज्य:अकोलाबाजारात बनावट कारखान्याची धग;🔥हाच तो शेंबाळपिप्रीत परवाना रद्द झालेला कुख्यात तस्कर शुभम जयस्वाल मोकाट कसा?🔥उत्पादन शुल्क अधिकारी नागलवाडांचे ‘अर्थपूर्ण’ अभय?🔥अकोलाबाजारातून ग्रामीण भागात रोज शेकडो पेट्या बनावट देशी दारूचा विषारी पुरवठा!🔥हाच तो एमपी ट्रेडर्स वाईन शॉप कळंब चा मालक मनीष जयस्वाल हा याच वाईन शॉप मधून नकली दारूची करतो विक्री
प्रतिनिधी/ यवतमाळ-/ घाटंजी तालुक्यातील अकोलाबाजार परिसर सध्या बनावट आणि जीवघेण्या विषारी देशी दारूच्या निर्मितीचा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे. अमरावतीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीच कारवाईचा बडगा उगारून काळाबाजार उघडा पाडलेला असतानाही,स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अकोलाबाजार सर्कल अधिकारी नागलवाड यांच्या संशयास्पद ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे दारू तस्कर शुभम जयस्वाल व मनीष जयस्वाल यांचे साम्राज्य दिवसेंदिवस फोफावत चालले आहे. सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी चाललेला हा भयानक खेळ त्वरित थांबवून या विषारी कारखान्यावर थेट हातोडा चालवावा, अशी संतप्त मागणी आता संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून जोर धरत आहे.
दारू तस्कर शुभम जयस्वाल याच्या काळ्या कारभाराची पार्श्वभूमी अत्यंत गंभीर आहे. काही महिन्यांपूर्वी, फेब्रुवारी महिन्यात अमरावतीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शेंबाळपिप्री येथील देशी दारूच्या दुकानावर अचानक छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान दुकानात थेट काचेच्या बाटल्यांवर बनावट लेबल्स चिकटवून, घातक व विषारी दारू भरण्याचे रॅकेट रंगेहात पकडले गेले होते. याप्रकरणी शुभम जयस्वालवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलीस कोठडीची हवा खावी लागली होती. इतकेच नव्हे, तर प्रशासनाने शेंबाळपिप्री येथील देशी दारू विक्रीचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला होता.
एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडी पडल्यानंतरही हाच तस्कर अकोलाबाजार येथे मोकाटपणे बनावट दारूचा कारखाना थाटून बसतोच कसा, हा यवतमाळ जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर लागलेला मोठा प्रश्नचिन्ह आहे.
अकोलाबाजार येथे शुभम जयस्वालचे एक घाऊक (ठोक) देशी दारूचे दुकान असून, एक किरकोळ (चिल्लर) विक्रीचे दुकानही आहे. याशिवाय त्याने मनीष जयस्वाल याचे चिल्लर विक्रीचे दुकानही भाडेतत्त्वावर घेतले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अवघ्या काही हजार लोकसंख्येच्या अकोलाबाजार गावातून या दोन्ही दुकानांच्या माध्यमातून दररोज तब्बल १०० ते १५० पेट्या दारूची विक्री कागदावर दाखवली जात आहे. एका छोट्याशा खेड्यात दररोज इतक्या प्रचंड प्रमाणात दारूची अधिकृत खप होणे निव्वळ अशक्य आहे. प्रत्यक्षात या दुकानांच्या आडून अकोलाबाजार येथे बनावट आणि विषारी देशी दारू तयार करण्याचा कारखाना अखंडपणे सुरू आहे. स्प्रिट आणि घातक रसायनांचे मिश्रण करून तयार केलेली ही बनावट दारू सीलबंद बाटल्यांमध्ये भरून बाजारात आणली जात असून, स्थानिक पातळीवर लाखो रुपयांची काळी उलाढाल दररोज सुरू आहे.
शुभम जयस्वाल आणि मनीष जयस्वाल यांनी सर्व नियम-कायदे धाब्यावर बसवून परिसरातील खेडोपाडी अवैध दारूविक्रीचे एक समांतर सिंडिकेट तयार केले आहे. अकोलाबाजार आणि घाटंजी परिसरातील प्रत्येक खेड्यात खास बूटलेगरांची (अवैध दारू विक्रेते) फौज तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक गावात दररोज किमान ३० पेट्या अवैध आणि बनावट दारूची खेप पोहोचवली जात आहे. कमी दरात उपलब्ध होणारी ही बनावट दारू ग्रामीण भागातील शेतमजूर, गरीब आणि तरुणांच्या माथी मारली जात असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. ही दारू कधीही एखाद्या मोठ्या विषबाधेच्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
बनावट दारूच्या या अवैध साम्राज्याची इत्यंभूत माहिती असतानांही अकोलाबाजार सर्कलचे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी नागलवाड यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.अमरावती विभागाला जी माहिती मिळते आणि जे अमरावतीच्या पथकाला दिसते, ते स्थानिक पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना दिसत नाही का? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांच्या या निष्क्रियतेमागे मोठे ‘अर्थकारण’ आणि नियमित ‘हप्तेखोरी’ असल्याचा संशय स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. कारवाईचे निव्वळ सोंग न करता, तस्करांना पाठीशी घालणाऱ्या या जबाबदार अधिकाऱ्यांचीही वरिष्ठ पातळीवरून चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेंबाळपिप्री प्रकरणाची पुनरावृत्ती अकोलाबाजारात सुरू असताना स्थानिक यंत्रणा पूर्णपणे गाफील आणि लाचार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त पराग नवलकर यांनी स्वतः या गंभीर प्रकरणात तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. अकोलाबाजार येथील बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त करून, जप्त साठ्याची रासायनिक तपासणी करावी आणि मुख्य सूत्रधार शुभम जयस्वाल व मनीष जयस्वाल यांच्याविरुद्ध अजामीनपात्र कलमान्वये गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी आता जोर धरत आहे. वरिष्ठ प्रशासन आता तरी जागे होऊन कारवाई करणार की आणखी एखाद्या मोठ्या विषारी दारूच्या दुर्घटनेची वाट पाहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)