वर्धा जिल्ह्यातील चारही नगर पंचायतीवर महाविकास आघाडी

0

प्रमोद पानबुडे / वर्धा :

वर्धा जिल्ह्यातील आष्टी, कारंजा, समुद्रपूर आणि सेलू या चारही नगर पंचायतीमध्ये महाविकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मंगळवारी झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीत आष्टी नगर पंचायत मध्ये काँगेसला अध्यक्षपद मिळाले, कारंजा येथे देखील अध्यक्ष पद राखण्यात काँगेसलाच यश मिळाले आहे. समुद्रपूर नगर पंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आरूढ झाला आहे तर जिल्ह्यात सेलू येथे पहिल्यांदा शिवसेनेने अध्यक्ष पदावर आरूढ होत आपला झेंडा फडकविला आहे.
आष्टी येथील अध्यक्षपदाच्या निवडीत आधीच स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने काँग्रेसच्या अनिल धोत्रे यांच्याकडे नागराध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी जनशक्ती संघटनेचे हुसेन अब्दुल हपीज शेख यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. तर सेलू येथे कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नसताना गेल्या काही दिवसांपासून घोडेबाजार होणार असल्याची सर्वत्र चर्चा होती. भाजप खासदार आणि आमदार सत्ता खेचून आणेल असे वाटत होते. दरम्यान कुठे माशी शिंकली हे कळलेच नाही. विधानसभेसाठी नगर पंचायतमध्ये तडजोड झाली असावी अशीच चर्चा असताना जिल्ह्यात पहिल्यांदा शिवसेनेचा महिला नगर अध्यक्ष बनली आहे. सेलू नगर पंचायत शिवसेनेच्या स्नेहल देवतारे अध्यक्ष बनल्या आहेत तर उपाध्यक्ष पद अपक्ष निवडून आलेल्या रेखा खोडके उपाध्यक्ष बनल्या आहेत.
समुद्रपूर नगर पंचायत नगराध्यक्ष योगिता तुळणकर यांची वर्णी लागली तर शिवसेनेचे बाबाराव थुटे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. येथे सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली ,यापूर्वी येथे भाजपची सत्ता होती.
कारंजा नगर पंचायत मध्ये कॉंग्रेस कडून स्वाती भिलकर तर भाजपकडून योगिता कदम यांनी नगराध्यक्ष पदाकरिता अर्ज दाखल केला होता. येथे काँग्रेसच्या स्वाती भिलकर या नगराध्यक्ष झाल्या तर उपाध्यक्ष भगवान बोवाडे यांची वर्णी लागली. माजी आमदार अमर काळे यांना पुन्हा आष्टी व कारंजा नगर पंचायतवर सत्ता काबीज करता आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!