वर्धा जिल्ह्यात कोरोना लसिकरणाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव
वर्धा/ प्रतिनिधी :
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्या गावाचे जलदगतीने लसिकरण करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 5 लक्ष रुपयांचा प्रोत्साहन पुरस्कार देऊन गौरविण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात 3 याप्रमाणे 24 ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यातील वर्धा, देवळी व हिंगणघाट या तालुक्यातील गावांना वायगाव निपाणी येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमास खासदार रामदास तडस, आमदार रणजित काबंळे, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, आरोग्य सभापती मृणाल माटे, समाज कल्याण सभापती सरस्वती मडावी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. सचिन ओम्बासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.राज पराडकर आदी उपस्थित होते.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसिकरण हाच एकमेव पर्याय आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरु असतांना लसिकरणाचे प्रमाण वाढावे आणि त्यासाठी ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळावे यासाठी पालकमंत्री सुनील केदार यांनी नाविण्यपुर्ण योजनेतून आपल्या गावाचे जलदगतीने लसिकरण करणाऱ्या गावांना प्रत्येकी 5 लक्ष रुपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरविण्याची योजना राबविण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील 3 याप्रमाणे जिल्ह्यातून 24 ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या तालुक्यांपैकी वर्धा, देवळी व हिंगणघाट तालुक्यातील ग्रामपंचायतींना पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते वायगाव निपाणी येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये वर्धा तालुक्यातील खरांगणा (गोडे), करंजी भोगे व कामठी या गावांचा समावेश आहे. देवळी तालुक्यातील अंबोडा, आंजी, नांदोरा तर हिंगणघाट तालुक्यातील शेगाव (कुंड), कान्होली व ढिवरी (पिपरी) या गावालील सरपंच व सदस्यांना पुरस्कार वितरीत करण्यात आले.
या गावांव्यतीरिक्त सेलु तालुक्यातील सेलडोह, सुकळी, दहेगाव. आर्वी तालुक्यातील मोरांगणा, तळेगाव (रघुजी), भादोड. समुद्रपुर तालुक्यातील बोथुडा, उबदा, परडा. आष्टी तालुक्यातील आनंदवाडी, वडाळा, भिष्णूर तर कारंजा तालुक्यातील नागाझरी, धानोली, मेटहिरजी या गावांची पुरस्कासाठी निवड करण्यात आली असून या गावांना देखील समारंभपुर्वक पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
0000000