वर्धा जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये 29 हजार दाखले, प्रमाणपत्रांचे वितरण

0

प्रतिनिधी / वर्धा :

लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत महसुल विभागाच्या 16 सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवा कालमर्यादेत उपलब्ध करून देणे बंधणकारक आहे. कमी त्रासात आणि कमी वेळेत सेवा उपलब्ध होत असल्याने नागरीक मोठ्या प्रमाणावर या ऑनलाईन सेवांचा लाभ घेत आहे. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात तब्बल 28 हजार दाखले, प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सामान्य नागरिकांची शासकीय कार्यालयातील कामे तातडीने व्हावीत यासाठी शासनाने डिजीटल पध्दत अंगिकारली आहे. शासनाच्या याच धोरणानुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काम केले जात असून केवळ नोव्हेंबर या एका महिन्यात तब्बल 28 हजार ऑनलाईन दाखले, प्रमाणपत्रांचे डिजीटल पध्दतीने वितरण करण्यात आले आहे. नागरिकांना कमीतकमी त्रासात आणि कालमर्यादेत उपलब्ध होणारी ही सेवा आणखी गतीमान करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहे.
सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांना महसूल विभागाच्यावतीने विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र दिले जाते. दाखले, प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतीने व्हावी यासाठी शासनाने डिजीटल, ऑनलाईन पध्दती अंगिकारली आहे. यामुळे नागरिकांना कालमर्यादेत आणि कमी खर्चात ही सुविधा उपलब्ध होत आहे. पुर्वी नागरिकांना तहसिल कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावा लागत होता. आता जिल्ह्यात ठिकठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे गावातच गरजु नागरिकांना हे दाखले, प्रमाणपत्र काही वेळातच उपलब्ध होत आहे.
जिल्ह्यात अगदी छोट्या गावात सुध्दा आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत आहे. कोणत्याही केंद्रावर जाऊन सर्वसामान्य नागरीक आपल्याला पाहिजे असलेल्या दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. सेवा केंद्रातील संबंधित सेवाधारक कागदपत्रांसह अर्ज स्कॅन करून ऑनलाईन सादर करतो. सदर अर्ज ऑनलाईनच संबंधित नायब तहसिलदार, तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर होतो आणि ऑनलाईन दाखला, प्रमाणपत्र मंजुर केला जातो. संबंधित व्यक्तीस डिजीटल स्वाक्षरीची ऑनलाईन प्रत सेवा केंद्रातूनच उपलब्ध करून दिली जाते.
जिल्ह्यात नोव्हेंबर या एका महिन्यात 29 हजार डिजीटल दाखले, प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात 1 हजार 518 वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, 225 शेतकरी प्रमाणपत्र, 11 हजार प्रतिज्ञापत्राचे प्रमाणीकरण, 3 हजार 597 जात प्रमाणपत्र, 10 हजार 400 उत्पन्न दाखले, 101 भूमिहीन कामगार प्रमाणपत्र, 2 हजार नॅान क्रिमीलेअर प्रमाणपत्र, 10 लघु जमीनधारक प्रमाणपत्र, 61 पत दाखले, 80 तात्पुरत्या निवास डिजीटल प्रमाणपत्रांचा समावेश आहे. ऑनलाईन प्रमाणपत्रातही जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनिय आहे.
आपले सरकार सेवा केंद्रातून सामान्य नागरिकांना कमी वेळेत आणि कमी त्रासात दाखले उपलब्ध होतात. त्यामुळे नागरीकांनी या केंद्रावर जाऊन दाखले, प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. सेवा केंद्रांनी कोणत्या दाखल्यांसाठी किती पैसे घ्यावेत हे निश्चित करून देण्यात आले आहे. केंद्राकडून जास्त पैसे घेतले जात असल्यास तक्रार नोंदवावी, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले. नागरिकांना RTS या मोबाईल ॲपद्वारेसुध्दा घरबसल्या सेवा मिळू शकतात. त्या ॲपचा देखिल लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!