वर्ध्यात चक्क नवनियुक्त काँग्रेसच्या नेत्याने केले भाजपा जिल्हाध्यक्षाचे स्वागत!
शहर प्रतिनिधी / वर्धा :
भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांचा वर्धा शहरात प्रथम आगमन निमित्त भाजपा व भाजयुमो, महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत केले. कार्यकर्ताच अध्यक्ष झाल्याने जवळपास सर्वांनामध्येच उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजिनामा देऊन काँग्रेसमध्ये गेलेले डॉ. शिरीष गोडे यांनी पक्षभेद विसरत दिलदारी दाखवत भाजपाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांचे रेल्वे स्थानकावर स्वागत केले. त्यामुळे अगा हे अजबचि घडले, असेच काहीसे म्हणावे लागेल.
सुनील गफाट यांचे वर्धा रेल्वे स्थानकावर ढोल ताश्यांच्या निनादात भाजपासह विविध आघाडीतील नेत्यांनी स्वागत केल्यानंतर स्कूटर रॅली काढण्यात आली. बजाज चौक, बडे चौक, तेथून श्री राम मंदिर येथे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन शिवाजी चौकात शिवाजी महाराजांना माल्यार्पण करून,संत तुकडोजी महाराज चौक येथे महाराजांच्या प्रतिमेला हारार्पण करून बॅचलर रोड वरून धंतोली येथील भाजपा जिल्हा कार्यालयात रॅलीचा समारोप झाला.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गफाट यांचे नगराध्यक्ष अतुल तराळे, आ. रामदास आंबटकर, प्रदेश सचिव राजू बकाने, प्रदेश ओबीसीचे सरचिटणीस संजय गाते, जिल्हा सरचिटणीस अविनाश देव, मिलींद भेंडे, अर्चना वानखेडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वरुण पाठक, महिला मोर्चाच्या मंजुषा दुधबळे, शितल डोंगरे, भाजपा वर्धा शहर अध्यक्ष पवन परीयाल, कमल कुलधरीया, श्रीधर देशमुख, जयंत कावळे, आदी कार्यकर्ते व पदाधिकारींनी स्वागत केले.