तेंदूपत्ता संकलनासाठी गेला असता वाघाने हल्ला करून केले ठार…
वर्धा -/ तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 65 वर्षीय व्यक्तीवर पट्टेदार वाघाने हल्ला करून त्यास ठार केले. ही घटना तालुक्यातील धावसा हेटी शिवारातील लिंगा मांडवी बीटात घडली. देवराव श्रावण राऊत रा. धावसा हेटी असे मृतकाचे नाव आहे.
देवराव राऊत हे मागील काही वर्षांपासून धावसा हेटी येथे राहतात. ते तेंदुपत्ता तोडण्यासाठी गावातील काही महिला-पुरुषांसोबत लिंगा मांडवी जंगल परिसरात गेले होते. त्यांच्यासोबत वन मजूरही होते. दाट जंगलात तेंदुपत्ता तोडत असताना सुरूवातीला त्यांना अस्वल दिसली. पण देवराव याने स्वत:ला सावरत आरडा-ओरड करून अस्वलीला जंगलात पिटाळून लावले. त्यानंतर देवराव व त्यांच्या सोबत असलेल्या दोन महिला तसेच सहा ते सात पुरुष सहका-यांनी पुन्हा नव्या जोमाने तेंदुपत्ता गोळा करण्याच्या कामाला सुरूवात केली. अशातच देवराव सोबत असलेल्यांना झुडपातून काहीतरी पळाल्याचा आवाज आल्याने त्यांनी देवराव याला आवाज दिला. पण प्रतिसाद मिळाला नसल्याने तेंदुपत्ता गोळा करीत असलेल्यांनी देवराव याचा शोध घेण्यास सुरूवात केली. याच शोध मोहिमेदरम्यान देवरावचा मृतदेह जंगल परिसरात आढळून आला.
काही अंतरावर झुडपात पट्टेदार वाघ असल्याचे तेंदुपत्ता तोडणा-यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मोठे धाडस करून वाघाला जंगलात पळून लावले. त्यानंतर संबंधित घटनेची माहिती वन्यजीव विभागाच्या अधिका-यांना देण्यात आली. माहिती मिळतच वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर गजभिये आणि त्यांच्या सहका-यांनी तसेच कारंजा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अधिका-यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेत उत्तरिय तपासणीसाठी कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.