शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणी साठी नागपूर हिवाळी अधिवेशनात संघर्ष करणार..
हिंगणघाट :माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात शासकिय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीचे आंदोलन अधिक तीव्र करणार असून नागपुर येथे अधिवेशनादरम्यान धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेच्यावेळी देण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवार हे ७ डिसेंबर पासुन अधिवेशनादरम्यान अन्नत्याग आंदोलनाला नागपूर येथे सुरवात करणार असल्याची माहितीसुद्धा आज २ डिसेंबर रोजी वैद्यकिय महाविद्यालय संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली.
हिंगणघाट शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी समिती तसेच महीला कृती समितीचा, तसेच समाजसेवी इडपवार यांचा संघर्ष सुरू आहे. याला सर्व राजकिय पक्षांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.
वर्धा जिल्ह्यात प्रास्तावित वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य सरकारचे वतीने मंजुरी मिळाली असली तरी त्याचे स्थान अजूनही निश्चित झाले नाही.
राज्य सरकारकडून वर्धा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निर्मितीचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.
सदर महविद्यालयाची स्थापना हिंगणघाट शहरात करण्यात यावी, यासाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती त्याचबरोबर महिला कृती समिती आणि शहरातील नागरिक, समाजसेवी, महीला संघटना या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती माजी आमदार प्रा राजू तिमांडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ७ डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवार पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलनाला नागपूर येथे सुरुवात करणार असून १५ डिसेंबर रोजी माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात भव्य असा मोर्चा हिंगणघाट येथुन विधानभवनावर धडकणार
असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या वेळी माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, सतीश धोबे,वासुदेव पडवे, अक्षय बेलेकर, आफताब खान,अनिल भोंगाडे याच्यासह राजकिय मंडळी व संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.
ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज -24