सिदी रेल्वेचे ठाणेदार ‘चकाटे’च्यां कारवाईवर प्रश्नचिन्ह?!
Byसाहसिक न्युज24
क्राईम प्रतिनिधी/ वर्धा:
सिंदी (रेल्वे) येथील बैलपोळ्याच्या दिवशी शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी सायकल दुरुस्ती करणाऱ्या हातमजुर अजय रामभाऊ लोंढेकर याला भरचौकात एका युवकाने जबर मारहाण केली. त्यावेळी पोळ्याच्या बंदोबस्तासाठी आलेले पोलीस पथक देखील हजर होते. परंतु, कोणीही त्याची सुटका केली नाही. त्याबाबत अजयने त्याच दिवशी तातडीने पोलीस स्टेशन गाठले व तोंडी कैफियत सादर केली. परंतु, स्थानिक पोलिसांनी अजयला पाच तास ठाण्यात बसून ठेवले. मात्र, गैरअर्जदार वाघमारे विरुद्ध कसलीच कारवाई केली नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या विशेषतः ठाणेदार चकाटे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अन्यायाचा पर्दाफाश व्हावा म्हणून अजय लोंढेकर यांनी पोलीस अधीक्षक यांच्यापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लेखी तक्रारी सादर केल्या आहे.
याबाबत विस्तृत माहिती देताना अजय लोंढेकर म्हणाला की, गांधी चौकात त्याचे सायकल दुरुस्तीचे छोटेसे दुकान आहे. पाच बाय सहा फूट जागेत चटई टाकून धंदा करून अजय पोट जगवितो. स्थानिक पालिकेचे माजी शिक्षण सभापती रामभाऊ लोंढेकर, विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे कट्टर समर्थक होते. अजयचा एक भाऊ वर्धा पोलीस दलात सेवारत आहे. जेष्ठ भाऊ महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात सेवारत होता. या अत्यन्त सरळ मार्गी तरुणास केवळ राजकीय वैयमनस्यातून तसेच बॅरिकेट लावण्याच्या मुद्द्यावरून त्याच्याच दुकानातील हवा भरण्याच्या पंपाने जबर मारहाण करण्यात आली. अजयला मारहाण करणारा युवक मंडप डेकोरेशनचा धंदा करतो. बॅरिकेट लावणे आणि मंडप उभारण्यासाठी त्याला अडचण येत असल्यास स्थानिक पोलीस व न.प. प्रशासनाच्या माध्यमातून हा वाद मिटविता आला असता.
मात्र, येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून भारतीय जनता पक्षाच्या अजय लोंढेकर याला मारहाण करण्यात आली. त्याबाबतची तक्रार घेऊन ठाण्यात घेलेल्या अजयला ठाणेदार चकाटे यांनी तब्बल पाच तास बसवून ठेवले. त्यानंतर त्याची जुजबी चौकशी करून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली, असे अजयचे म्हणणे आहे. वास्तविक अजयला झालेल्या मारझोडीमुळे त्याचा एक कान निकामी झाला आहे. सेवाग्रामच्या रुग्णालयात त्याने औषधोपचार घेतला असे त्याचे म्हणणे आहे. परंतु, वैद्यकीय अहवालास ठेंगा दाखवत ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांनी गावपुढाऱ्यांपुढे नांगी टाकली, असे नागरिकांचे मते आहे. या संदर्भात पोलिसांकडे माहिती घेण्यासाठी ज्यांनी संपर्क केला त्यांना उद्धट वागणूक मिळाली, अशी चर्चा आहे. कोणत्याही प्रकरणाची माहिती विचारली असता चार तासानंतर माहिती मिळेल, असे सांगण्याचा शिरस्ता येथे रुजू झाला आहे.
अजय लोंढेकर यांनी याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक, समादेशक (नागपूर), गृहमंत्री फडणवीस आणि इतरांना तक्रारीची प्रत पाठविली आहे. याप्रकरणी दोषींवर तसेच गैरअर्जदाराविरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंदवावा अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
कारवाईची माहिती फक्त अर्जदाराला देईन…!
अजय लोंढेकर याला कोणी मारले, कारण काय होते, कारवाई कोणत्या प्रकारची झाली याचे उत्तर मी अर्जदारालाच देईल. पत्रकार असो की समाजसेवक त्यांना माहिती देणे मला बंधनकारक नाही.
चंद्रशेखर चकाटे
पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे)