सेवाग्राम विकास आराखडा : 62 कामे पूर्ण उर्वरीत कामे अंतिम टप्प्यात

0

 

प्रतिनिधी/ वर्धा:

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे 150 वे जयंती वर्ष व त्यांच्या जिल्हयातील आगमनास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शासनाने वर्धा, सेवाग्राम व पवनारचा विकास करण्यासाठी सेवाग्राम विकास आराखडा जाहीर केला होता. या तिनही स्थळाच्या विकासासह गांधीजींच्या विचार व मुल्याचे दर्शन घडविणारे आराखडयातील अनेक कामे पुर्ण झाले असून उर्वरीत कामे अंतिम टप्प्यात आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आराखडयाचा आढावा घेऊन मार्च पर्यंत उर्वरीत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

बैठकीला जिल्हाधिका-यासह जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश माथुलकर, विद्युतचे उपअभियंता ईशान कुलकर्णी, मेडाचे जिल्हा व्यवस्थापक अभिनव कुळकर्णी, आराखडयाच्या प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार निरा अडारकर, अरुण काळे, रजनीश गोरे, वसीम खान आदी उपस्थित होते.

सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत वर्धा, सेवाग्राम व पवनार येथे विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहे. या तिनही ठिकाणाच्या विकासासह गांधीजींच्या विचार व मुल्यांचे दर्शन यातून होणार आहे. आराखडया अंतर्गत एकुण 126 कामे केली जात असून त्यापैकी 62 कामे पूर्ण झाली आहे. उर्वरीत सर्व कामे अंतिम टप्प्यात आहे. या कामांसाठी 160 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहे.

आराखडयातील कामांमुळे सेवाग्राम, वर्धा व पवनारचा चेहरा मोहरा बदलणार असून या तिनही ठिकाणांच्या सौदर्यात भर पडणार आहे. आराखडया अंतर्गत करण्यात आलेल्या महत्वपूर्ण कामांमध्ये सेवाग्राम येथे उभारण्यात आलेले चरखा सभागृह व परीसरातील महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या आकर्षक पुतळयांचा समावेश आहे. सेवाग्राम येथे येणा-या पर्यंटकासाठी आकर्षक यात्री निवास उभारण्यात आले आहे. तिनही ठिकाणी रस्ते व चौकांचे सौदर्यीकरण, धाम नदीवर सुशोभिकरण तसेच ठिकठिकाणी वेगवेगळया प्रकारचे शिल्प उभारण्यात आले आहे.  ठिकठिकाणी भिंतीवर गांधीजींच्या कार्याची महती सांगणारे सुंदर चित्र रेखाटण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आराखडयाचा काम निहाय आढावा घेतला. सध्या अंतिम टप्प्यात असलेली सर्व कामे मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी सबंधित विभाग  व काम करणा-या संस्थांना दिले.  वर्धा, सेवाग्राम हे जागतिक किर्तीचे स्थळ असून पर्यंटकांसाठी आराखडयातून विविध प्रकारच्या सुविधाही निर्माण करण्यात येत आहे. यामुळे या ठिकाणी भविष्यात पर्यंटकांची संख्याही वाढणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!