हिंदी विश्‍वविद्यालयात त्रिदिवसीय वर्धा साहित्‍य महोत्‍सवाचे थाटात उद्घाटन

0

प्रतिनिधी /वर्धा:
महानायकांचे विचार नव्‍या पीढीत रुजविण्‍याची गरज आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय शिक्षण मंत्री व लोकसभेचे खासदार डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी केले. वर्धा साहित्‍य महोत्‍सव हे एक अभियान असून ते देशभरात पोहोचेल असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. त्रिदिवसीय वर्धा साहित्‍य महोत्‍सवाचे उद्घाटन मंगळवार 26 एप्रिल रोजी वर्ध्‍यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात करण्‍यात आले. याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्‍हणून संबोधित करत होते. उद्घाटन समारंभाला बाबासाहेब भीमराव आंबेडकर केंद्रीय विश्‍वविद्यालय, लखनौ येथील कुलाधिपती प्रो. प्रकाश बरतुनिया तसेच वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री रामदास तडस यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विश्‍वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल होते. हा महोत्‍सव 28 एप्रिल पर्यंत चालणार असून यात देशातील महानायकांवर लिहिलेल्‍या विविध आठ भाषांमधील कादंब-यांवर चर्चा होणार आहे.
डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ म्‍हणाले की राष्‍ट्रीय शिक्षण धोरण जसजसे युवावस्‍थेत येईल तसतसे देश विश्‍वगुरू बनण्‍याकडे अग्रेसर होईल.मनुष्‍याला मनुष्‍य बनाण्‍याची प्रक्रिया या धोरणात असून भारतीय भाषांना बळ देण्‍यासाठी हे धोरण कार्य करील असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. वर्धा साहित्‍य महोत्‍सव महानायकांचे विचार-तत्‍वज्ञान आणि आदर्श लोकांपर्यंत त्‍यांच्‍या भाषेत पोहचविण्‍याचे अभियान ठरेल असे सांगून ते म्‍हणाले की वर्धा ही गांधी आणि विनोबा यांची कर्मस्‍थली आहे. या भूमीतून वसुधैव कुटुंबकम आणि सर्वे सुखी निरामय हा संदेश देश-विदेशात पोहचेल. हा संदेश आपणाला आपले आचरण, विचार आणि व्‍यवहारात आणला पाहिजे. विश्‍वविद्यालयाने कायद्याचे शिक्षण हिंदी भाषेत सुरू केले असून हा निर्णय म्‍हणजे राष्‍ट्रीय शिक्षण धोरण कार्यान्वित करण्‍याचा महत्‍वाचा प्रयत्‍न होय असे ते म्‍हणाले. हिंदी भाषा ही देशाच्‍या एकतेचे सूत्र होय. हिंदीचे वैभव जगभरात दिसून येत असून हिंदी ही सर्व भारतीय भाषांची आत्‍मा आहे. भारतीय भाषांच्‍या दृष्टीने आजचा दिवस नवा इतिहास लिहिणार असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल म्‍हणाले की विश्‍वविद्यालय हिंदीला आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर स्‍थापित करण्‍याचे स्‍वप्‍न पूण करील. वर्धा साहित्‍य महोत्‍सव हे या दिशेने टाकलेले एक छोटे पाऊल होय. भारतीय साहित्‍य आणि शैक्षणिक जगतात एक मोठी उभारी घेण्‍याची विश्‍वविद्यालयाची योजना आहे. सर्व भारतीय भाषांबरोबर हिंदीला प्रोत्‍साहण देण्‍याचा आमचा प्रयत्‍न आहे. विदर्भात तापमान वाढले असतांना वर्धा साहित्‍य महोत्‍सवात देशभरातून आलेल्‍या साहित्यिकांच्‍या माध्‍यमातून एक शीत लहर प्राप्‍त झाली आहे आणि ही आम्‍हासाठी ऊर्जेचे काम करील असे ते म्‍हणाले. महोत्‍सवात आठ भारतीय भाषांवर व्‍यापक चर्चा होणार आहे. हे वर्ष स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव आणि विश्‍वविद्यालयाचे रजत जयंती वर्ष असून भारताच्‍या साहित्‍यात सचेत, सकारात्‍मक आणि विविधतेचे स्‍वरूप या महोत्‍सवातून मिळेल अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
प्रो. प्रकाश बरतुनिया यांनी हा महोत्‍सव भारतीय भाषांचे अदभूत साहित्‍य संमेलन व संगम होय असे सांगून महानायकांनी देश, संस्‍कृती व मानवसेवा केली आहे. महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने त्‍यांचे पुनर्स्‍मरण केले जात आहे. या मंथनातून जे नवनीत निघेत ते शिक्षणक्षेत्र आणि देशाकरिता उपयोगी ठरेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री रामदास तडस म्‍हणाले की साहित्‍य हे समाजाला पुढे घेऊन जाण्‍याचे काम करते. या महोत्‍सवाने वर्धा शहराला एक नवी ओळख निर्माण होईल. वर्ध्‍यातील हिंदी विश्‍वविद्यालयाने देशातच नव्‍हे तर जगात एक नवी भरारी घेतली आहे. यामुळे देश-विदेशातील विद्यार्थी वर्ध्‍यात येतात. हिंदीला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी भारत सरकार चालवित असेलेले कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती खासदार तडस यांनी दिली. वर्ध्‍याचे वैशिष्‍टये सांगतांना ते म्‍हणाले की महात्‍मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची ही कर्मभूमी आहे. जगातील सर्वात मोठा चरखा वर्धा येथे स्‍थापित करण्‍यात आला आहे. येणा-या काळात सेवाग्राम रेल्‍वे स्‍थानकाचा विकास होणार असून त्‍यांची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. विश्‍वविद्यालयाचा विकास आणि प्रगतीत सहकार्य करण्‍याचा शब्‍द त्‍यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाचे संचालन वर्धा साहित्‍य महोत्‍सवाचे संयोजक, हिंदी व तुलनात्‍मक साहित्‍य विभागाचे प्रो. कृष्‍णकुमार सिं‍ह यांनी केले तर आभार प्रकुलगुरु प्रो. हनुमानप्रसाद शुक्‍ल यांनी मानले. दीप प्रज्ज्‍वलन करुन तसेच विश्‍वविद्यालयाचे कुलगीत वाजवून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी विश्‍वविद्यालयाच्‍या प्रकाशन विभागाने लावलेल्‍या ग्रंथ प्रर्दशनाचे अवलोकन पाहुण्‍यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाला सुविख्‍यात साहित्यिक पद्मश्री श्री विष्णु पण्ड्या, गोविंद मिश्र, डॉ. योगेंन्‍द्र नाथ शर्मा ‘अरूण’, पद्मश्री प्रो. अभिराज राजेंद्र मिश्र, प्रो. राजेंद्र तिवारी, प्रो. टी. वी. कट्टीमनी, प्रो. देवशंकर नवीन, के.सी.अजय कुमार, दामोदर खडसे, प्रो. चित्तरंजन कर, अग्निशेखर, डॉ. बीना बुदकी, एस. के. अग्रवाल, अमिता पाण्‍डेय, आनंद निर्वाण, ओमप्रकाश तिवारी, राजू मिश्र, दत्तात्रय मुरूमकर, सुमन जैन, डॉ. हिमांशु वाजपेयी यांच्‍या सह अधिष्‍ठातागण, विभागाध्‍यक्ष, अध्‍यापक, शोधार्थी, साहित्‍य प्रेमी व वर्धा शहरातील गणमान्‍य नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!