अवैध दारू वाहतूक प्रकरणी हरी घंगारेसह बारमालकावर सिंदी पोलिसांची दमदार कारवाई.
🔥 याप्रकरणी दोन आरोपींना अटक,
🔥 मुख्य आरोपी हरी घंगारे व समीर जयस्वाल फरार
🔥 कवठा-सिंदी (रेल्वे) मार्गावरील घटना
🔥७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
सिंदी (रेल्वे) : कवठा-सिंदी मार्गावर अवैधरित्या दारूची वाहतूक केल्या प्रकरणी दारू विक्रेत्यांसह बारमालकावर सिंदी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्या ताब्यातून देशी-विदेशी दारूसह ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही घटना दिनांक ३१ ऑक्टोबरच्या रात्री घडली. नेमेश उर्फ नेहुल राजू बेलखोडे व गोल्डन उर्फ विनोद येनूरकर दोन्ही राहणार सिंदी (रेल्वे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. यातील मुख्य आरोपी हरी नागोराव घंगारे व बारमालक समीर जयस्वाल हे दोन आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
याबाबत सिंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ ऑक्टोबरच्या रात्री सिंदी पोलिसांना गुप्त खबरीकडून खबर मिळाली की, सिंदी (रेल्वे) येथे राहणारा अवैध दारू विक्रेता हरि नागोराव घंगारे याचे दोन नोकर नेमेश उर्फ नेहुल राजू बेलखोडे व गोल्डन उर्फ विनोद येनूरकर दोन्ही राहणार सिंदी (रेल्वे) हे एका काळया रंगाच्या मोपेड वाहन क्रमांक एम. एच. ३२ एटी १३९७ ने देशी-विदेशी दारूची कवठा-सिंदी पांदण रस्त्याने अवैधरित्या वाहतूक करीत आहे. अशा प्राप्त खबरेवरून सिंदी पोलिसांनी कवठा-सिंदी मार्गावर सापळा रचून नाकाबंदी करून नेहुल बेलखोडे व विनोद येनूरकर या दोन आरोपींना ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता यांच्या ताब्यात असलेली लावणी संत्रा कंपनीच्या १८० एम. एलच्या देशी दारूच्या १४४ बॉटल (तीन पेट्या) व ओसी. ब्लू. कंपनीच्या १८० एम. एलच्या २४ निपा (अर्धीपेटी) एकूण ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत दोन्ही आरोपींना पोलिसांनी पोलिसी हिसका दाखविताच सदरचा माल हरी नागोराव घंगारे राहणार पिपरा रोड सिंदी (रेल्वे) याच्या सांगण्यावरून वर्धा-नागपूर महामार्गावरील ग्रीन व्हिलेज बार वडगाव, जिल्हा नागपूर येथून सिंदी (रेल्वे) येथे आणत असल्याचे त्या दोघांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून दोन नोकर, मुद्देमालाचा मालक हरी गंगारे व बार-मालक समीर जयस्वाल अशा चौघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत सिंदी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र, यातील मुख्य दोन आरोपी हरी घंगारे व बारमालक समीर जयस्वाल फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे. सिंदी पोलिसांच्या या दमदार कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सदरची कारवाई नूरूल हसन पोलीस अधीक्षक वर्धा, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे, एस.डी.पी.ओ. मकेश्वर, प्रभारी ठाणेदार संदीप गाडे, पोलीस स्टेशन सिंदी यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टॉफ आनंद भस्मे, अमोल पिंपळकर, सचिन उईके, कांचन चापले, संदेश सोयाम यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी.एस.आय. राजू सोनपितरे करीत आहेत.
दिनेश घोडमारे सहासिक न्यूज -24