अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन; आज सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य संघटनांची संयुक्त सभा
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा:
आगामी ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात वर्धानगरीत आयोजित असून संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य संस्थांची संयुक्त सभा रविवार, दि. २५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
वर्धानगरीत यापूर्वी १९६९ साली ज्येष्ठ साहित्यिक पु. शि. रेगे यांच्या अध्यक्षतेखाली ४८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वावलंबी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. ही संधी पुन्हा एकदा वर्धेकरांना प्राप्त झाली असून त्यासंदर्भात आयोजित सभेला अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे व विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय पदाधिकारी उपस्थिती राहणार आहेत. या पहिल्या सभेत अखिल भारतीय संमेलनाची पार्श्वभूमी, व्यापकता, आयोजनाबाबतची सद्यस्थिती, विविध सामाजिक, सांस्कृतिक व साहित्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका, अपेक्षा व सूचना, स्वागत समिती तसेच स्थानिक पातळीवरील विविध समित्यांचे गठण, संयुक्त सहभाग आदी विषयांवर सर्वांगीण चर्चा करण्यात येणार आहे. या सभेत मांडल्या जाणाऱ्या सूचनांची नोंद घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळासमोर सदर सूचना ठेवल्या जातील. याशिवाय, अल्पावधीतच दुसरी सभा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे.
रविवारी आयोजित या सभेत जिल्ह्यातील साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, उपाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंढे, सचिव रंजना प्रदीप दाते, सहसचिव प्रा. पद्माकर बाविस्कर, कार्यक्रम प्रमुख डाॅ. स्मिता वानखडे, कोषाध्यक्ष प्रशांत पनवेलकर, कार्यकारी सदस्य डॉ. पुरुषोत्तम माळोदे, प्रा. शेख हाशम, प्रा. मीनल रोहणकर, ज्योती भगत, डॉ. राजेश देशपांडे, मार्गदर्शक प्रा. सरोज देशमुख, प्रा. दिगंबर साबळे, डॉ. गजानन कोटेवार, डॉ. विलास देशमुख, प्रा. डॉ. महावीर पाटणी, प्रशांत देशमुख, गुणवंत डकरे यांनी केले आहे.