🔥शेतकरी पेरणीपासून वंचित; पायपीट करण्याची वेळ, महसूल विभाग न्याय देणार का?
आष्टी शहीद..प्रतिनिधी,(नरेश भार्गव) आष्टी तालुक्यातील दृग वाडा येथील शेतकरी वसंतराव ठाकरे यांच्या शेतरस्त्याचा प्रश्न गेल्या एक महिन्यापासून तहसील कार्यालयाच्या फेऱ्यांमध्ये अडकून पडला आहे. मौजा सालोरा शेत शिवारात असलेल्या त्यांच्या पाच एकर शेतीकडे जाणारा पारंपरिक रस्ता एका शेतकऱ्याने अडवून धरल्याने ठाकरे यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेतीचा हंगाम सुरू असताना रस्ता बंद असल्याने पेरणीच्या कामावर परिणाम झाला असून शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. रस्ता खुला करून मिळावा यासाठी त्यांनी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला, मात्र महिनाभर उलटूनही या प्रकरणावर ठोस कार्यवाही झालेली नाही.
राज्याचे महसूल मंत्री रस्ता अडवणाऱ्यांवर तात्काळ अटक करून कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आदेश देत असल्याचे सांगितले जाते. मात्र स्थानिक पातळीवर त्या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणाबाबत तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोनला प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. तसेच व्हॉट्सॲपद्वारे माहिती देऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशा एकेकोर तहसीलदार वर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा मागणी जोर धरत आहे.
महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्याला न्यायासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार? महसूल मंत्र्यांच्या आदेशांचा स्थानिक प्रशासनावर परिणाम होणार का? असा सवाल आता शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.