कुणी पाणी देता का पाणी, महिन्याभरापासून नळ कोरडे
नितीन हीकरे / राळेगाव:
राळेगाव शहरातील नळ गेल्या महिनाभरापासून बंद आहे. उन्हाची तीव्रता वाढत असतांना शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गँभीर बनली आहे. राळेगाव शहरातील नागरिकांनी याबाबत न. प. कडे वारंवार नळ नियमित येण्याची मागणी केली. मात्र तांत्रिक कारणे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली. याबाबत राळेगाव येथील नागरिकांनी त्वरित पाणीपुरवठा करण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. दि. 16 मार्च रोजी निवेदन देण्यात आले.
राळेगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याचे नाव घेत नाही. उन्हाळा आला कीं हा प्रश्न अधिक जटिल बनतो. पावसाळा सुरु झाला कीं सर्वांना याचा विसर पडतो ही नित्याची बाब झाली आहे.
मोटर जळणे, पाइपलाईन फुटले, अनियमित वीजपुरवठा आदि कारणानी नळ महिना महिना न येणे हा प्रकार नेहमीचा झाला आहे. सातत्याने पाणी प्रश्नाबाबत नागरिकांची ओरड असते. अनेकांनी न. प. ला नियमित नळ येण्याची मागणी केली. सर्वक्षेत्रीय अधिकारी या नात्याने उपविभागीय अधिकारी राळेगाव यांनी या पश्नाबाबत तातडीने कारवाई करावी. तसे निर्देश द्यावे अशी मागणी राळेगाव येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. नागरिकांच्या संयमाचा बांध फुटू देऊ नये. अन्यथा जनआंदोलन करण्याखेरीज अन्य मार्ग नाही असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
राळेगाव शहरातील बाळु धुमाळ, प्रकाश खुडसंगे, दिलीप कन्नाके, किशोर नाखले, प्रसाद ठाकरे, पराग मानकर, तेजस ठाकरे, प्रतिभाताई खुडसंगे, प्रणाली धुमाळ, प्रतीभा नाखले, तोटे आदि नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.