केदारेश्वर मंदिर प्रकरणात चौकशी करुन कारवाई करा..आमदार बाळासाहेब मांगुळकर यांचे जिल्हाधिका-यांना पत्र….

0

🔥केदारेश्वर मंदिर प्रकरणात चौकशी करुन कारवाई करा..आमदार बाळासाहेब मांगुळकर यांचे जिल्हाधिका-यांना पत्र

यवतमाळ -/ यवतमाळ शहरातील सुमारे १५०० वर्षे जुने पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखालील केदारेश्वर (महादेव) मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम सुरु आहे. या अनधिकृत कामांबाबत गंभीर दखल घेत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे पत्र यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. सदर प्रकरणाची दखल घेतल्याप्रकरणी तक्रारकर्ते अमोल कोमावार यांनी बाळासाहेब मांगुळकर यांचे आभार मानले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची सुनावणी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कक्षात सुध्दा सुरु आहे.

शहरातील पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली असलेल्या सुमारे १५०० वर्षे जुन्या केदारेश्वर (महादेव) मंदिर परिसरात नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आल्यानंतर काही अनधिकृत कामे सुरू असल्याची माहिती समोर आली. या कामांमुळे ऐतिहासिक वारशाला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अमोल कोमावार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आमदार मांगुळकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण अतिसंवेदनशील असल्यामुळे आमदार मांगुळकर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून मांडावे अशी मागणी अमोल कोमावार यांनी केली आहे.
पुरातत्त्व विभागाच्या नियमानुसार त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही प्राचीन मंदिरात बांधकाम, दुरुस्ती किंवा बदल करता येत नाही. याठिकाणी कुठलीच परवानगी न घेता मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्याचे समोर आले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील पुरातन विधीवत स्थापित मुख्य शिवलिंगाच्या संरचनेत बदल तसेच पंधराशे वर्षे जुने ऐतिहासिक कुंड बुजवून संरचनेत बदल करण्यात आला. या कुंडातील मोठ्या संख्येत असलेले कासव कुठे गेले याचाही पत्ता लागलेला नाही. वास्तविक पुरातत्व विभागाने यापुर्वीच अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहे मात्र जिल्हा प्रशासनाने कारवाई केलेली नाही. बांधकाम आणि जमिन विक्रीमध्ये मोठया प्रमाणात गैरप्रकार झाल्याने ऑडीट करण्याची मागणी सुध्दा अमोल कोमावार यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!