खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त, मात्र प्रशासन, राजकीय नेते सुस्त
मदनी आमगाव / गजेंद्र डोंगरे :
परिसरातील रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. मात्र प्रशासन व राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील त्रस्त नागरिक करीत आहे.रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने प्रवाशांसाठी धोकादायक भीतीचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नसल्याने ग्रामस्थांसह प्रवाशीवर्गाने नाराजी व्यक्त करीत आहे.कारंजा,सेलू येथील तालुक्याच्या हद्दीतून हा मार्ग जात असून जामनी, मसाळा, आकोली, दिनकर नगर, हेटी,आमगाव,मदनी, बोरखेडी,मदना,तामसवाडा,माळेगाव परेंत तसेच झडशी पासून ते जंगली आमगाव परेंत या रस्त्यावरून जातांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकांची वाहने खराब झाली आहेत. काहींना मणक्यांचे आजार जडले आहे. तसेच काहींना अपघाताचा सामना करावा लागत आहे.मात्र, प्रशासन, लोक प्रतिनिधी व राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. हा भाग व्याघ्रप्रकल्पात येत असून हा भाग जंगल व्याप्त आहे.जंगलात हिंस्र प्राणी मोठ्या संख्येने आहेत.मात्र, जीवघेण्या खड्डेमय रस्त्यातून प्रवासी नागरिकांना जंगलातून वाट काढावी लागते. प्रशासन एखादी मोठी अप्रिय घटना घडण्याची वाट बघतोय का?असा सवाल उपस्थित होत आहे. या भागातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, प्रवाशी व वाहनचालकांना हा मार्ग डोकेदुखी ठरत आहे. जागोजागी रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांची संख्या मोठी असल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकवेळा दुचाकीस्वारांना खड्डे वाचविताना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.या भागातील बरेच रस्ते नागमोडी वळणाची असून काही भागातील सुरक्षा भिंती जीर्ण होऊन खचल्या आहेत. तर काही ठिकाणी वळणावरील लोखंडी कठडे अपघातात तुटलेले आढळून येतात .मात्र, नागरिकांचा दोन्ही तालुक्यांशी दररोजचा संपर्क येत असतो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तालुक्यातील कारंजा, सेलू तसेच वर्धेला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा व सोयीचा आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या मार्गाने अवजड वाहनाची वर्दळ मोठी असल्याने डांबरीकरण नेहमीच उखडले जात आहे. तालुक्याला बाजारपेठ असल्याने या भागातील व्यापारी, दुकानदार, शेतकरी, शालेय विद्याथी आदींसह याच रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो.तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी गेल्या दोन ते तीन वर्षांच्या काळात या रस्त्याच्या डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र, दरवर्षी रस्त्याची परिस्थिती जैसे-थे असल्याचे चित्र दिसून येते. तालुका हद्दीपर्यंत रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी केली जाते. काही दिवसांनंतर पुन्हा खड्डे निर्माण होत असतात . त्यामुळे या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण होणे गरजेचे आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे चित्र बरेच वेळा दिसून येते. महिला, प्रवाशी, रुग्ण यांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. डांबर उखडले गेल्याने माती व धुळीचा सामना करावा लागत आहे. रस्ता कधी दुरुस्त होणार ? असा सवाल प्रवाशी तसेच ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या भागात दळणवळण मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे ग्रामीण भागात विकास होण्यासाठी रस्ते दर्जेदार असने काळाची गरज आहे.मात्र, पक्का रस्ता कधी होणार ? हा प्रश्न नागरिकांना सतत भेडसावत आहे.