खूशखबर! पेट्रोल डिझेल स्वस्त होणार; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू
नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिवाळी निमित्त देशातील नागरिकांसाठी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार आहे. पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केलीय. उद्यापासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी करण्यात आलेय.
पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवरील कर दुपटीने कमी केला
उत्पादन शुल्कातील कपातीबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवरील कर दुपटीने कमी करण्यात आलाय. याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. रब्बी पिकाचा हंगाम सुरू होत आहे. शेतीच्या कामात वापरलेली उपकरणे प्रामुख्याने डिझेलवर चालतात. अशा परिस्थितीत डिझेलचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.