🔥जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त आर्वी शहरात भव्य रॅलीचे आयोजन.🔥आमदार सुमितभाऊ वानखेडे यांनी दिला एकता आणि भाईचाऱ्याचा संदेश
आर्वी -/आज आर्वी शहरात जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत भाईचारा आणि एकतेचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला. हातात हिरवे झेंडे, पैगंबरांचे बॅनर आणि घोषणाबाजी करत शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेल्या या रॅलीचे ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. मोहम्मद पैगंबरांनी मुस्लिम समाजासाठी दिलेला संदेश म्हणजे बंधुता, समानता, शांती आणि सद्भावना हा असून हा संदेश केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श आणि मार्गदर्शक आहे.या भव्य रॅलीत आर्वी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुमितभाऊ वानखेडे यांनी आवर्जून उपस्थित राहून नागरिकांच्या आनंदात सहभाग घेतला आणि उपस्थितांचे अभिवादन केले. यावेळी बोलताना आमदार महोदय म्हणाले की, आर्वी हे सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेले शहर असून येथील हिंदू-मुस्लिम एकता ही देशासाठी आदर्श आहे. शहरात शांतता, सलोखा आणि एकोपा टिकून राहिल्यासच आर्वी शहराचा,सर्वांगीण विकास शक्य आहे आणि या विकासासाठी मी सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणार आहे.मोहम्मद पैगंबर यांनी सांगितलेल्या शांतीच्या मार्गाने चालल्यास जीवनात शांतता नांदेल असेही त्यांनी सांगितले.या रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आर्वी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. रॅली अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात पार पडली. शेवटी आयोजकांच्या वतीने सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे आणि आमदार सुमितभाऊ वानखेडे यांचे आभार मानण्यात आले आणि सर्वांना जश्ने ईद मिलादुन्नबीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.