जिल्ह्यातील प्रत्येक गाव रस्त्याने जोडणार – पालकमंत्री सुनील केदार
प्रतिनिधी / वर्धा :
शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य शासन काम करीत आहे. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी रस्ते, आरोग्य, पाणी व शिक्षणाच्या सुविधेसाठी काम केले जात आहे. प्रत्येक गावात दळणवळणाच्या सुविधा व्हाव्यात यासाठी रस्त्याची कामे मोठया प्रमाणावर हाती घेण्यात आली आहे. या रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणी दूर होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सूनील केदार यांनी केले.
हिंगणघाट तालुक्यातील कानगाव येथे नांदगाव ते कानगाव या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. हिंगणघाट -नांदगाव –कुटकी- काचनगाव- कानगाव, हिंगणघाट- सातेफळ -लाडकी -नागरी माढेळी या 52 किमी लांबीच्या 195 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचा भूमीपूजन कार्यक्रम कानगाव येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला आ.रणजित कांबळे, हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, मनोज चांदूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, हिंगणघाटचे उपअभियंता श्री. धमाने, जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग, नितीन देशमुख, कानगावच्या सरपंच उपस्थिती होते.
कोरोना काळात संपूर्ण देशाची आर्थिक गती थांबली असतांनाही राज्य शासनाने विकासाच्या कामात खंड पडू दिला नाही. शासन गोरगरीब, शेतकरी व सामान्य नागरिकांच्या हितासाठी प्रयत्न करीत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हयातील प्रत्येक गावांमध्ये नळ योजनेची कामे हाती घेण्यात आली असून येणाऱ्या काळात वर्धा जिल्हा 100 टक्के टँकरमुक्त करण्यात येणार असल्याचे श्री केदार यांनी सांगितले. एक वर्षात या भागातील संपूर्ण रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल. त्याच बरोबर कानगाव येथे लवकरच ग्रामपंचायत बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे श्री केदार म्हणाले.
सदर रस्त्यांची कामे हायब्रिड ॲन्युईटी मॉडेल कार्यक्रमाअंर्तगत करण्यात येत असून रस्त्याचे बांधकाम झाल्यावर पुढील दहा वर्ष रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असणार आहे. येणाऱ्या काळात कात्री-कानगाव- देवळी रस्ता प्रस्तावित करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल शेतापासुन बाजारापर्यंत नेण्यासाठी मातोश्री पांदन रस्ते योजनेंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्याची कामे हाती घेण्यात येत असल्याचे आ. रणजित कांबळे म्हणाले.
तत्पुवी नांदगाव येथे रस्त्याच्या बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले. यावेळी आमदार रणजित कांबळे, माजी आमदार अशोक शिंदे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार सतिश मासाळ, नादंगावच्या सरपंच उपस्थित होते.
0000