जोमात कामाला लाग म्हणत उद्धव ठाकरे यांनी फिरविला नेहाल पांडे यांच्या पाठीवरून हात

0

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
बाळा जोमात काम कर, आज घाई आहे, उशीर झालेला आहे, पोहरादेवी पोहचायचे आहे. बाळा जोमात काम कर, जिद्दीने कामाला लाग, मला यवतमाळला भेट असे म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्ध्याच्या युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या नेहाल पांडे या युवा पदाधिकाऱ्याच्या पाठीवर हात फिरवत आशीर्वाद दिलाय. उद्धव ठाकरे युवा पिढीला जोमात कामाला लागा असे सांगतच यवतमाळकडे रवाना झालेय. अखेर जय महाराष्ट्र म्हणत उद्धव ठाकरे यांनी युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले. मोठ्या संख्येने युवक, महिला आणि पुरुष उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी कारला चौक परिसरात जमले होतेय.
महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यानंतर सत्तापालट झाली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी विदर्भाचा दौरा काढून शिवसैनिकांना बळ देण्याचे काम सुरू केले आहे. आज रविवार 9 रोजी नागपूरहून यवतमाळ येते जात असताना स्थानिक नेत्यांनी त्यांचे पवनार येथे जंगी स्वागत केले. मात्र, अवघ्या एक मिनिटांचं दर्शन देत ते यवतमाळच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. पक्ष बळकटीकरण सोबतच शिवसैनिकांना धीर देण्याचा प्रयत्नही या दौर्‍यातून केला जात आहे. मागील काही महिन्यांपासून जिल्ह्याला जिल्हा संपर्क प्रमुख नव्हते. त्यामुळे निलेश धुमाळ यांची नुकतीच जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. शनिवार 8 रोजी वर्धेच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन धुमाळ यांनी रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पवनार येथे ‘जंगी’ स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्या अनुषंगाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज रविवार 9 रोजी पवनार गाठून सकाळी 9.30 वाजतापासूनच उद्धव साहेबांची चातकाप्रमाणे वाट बघत होते. यावेळी युवा सेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. 10.30 वाजताची वेळ होती. यादरम्यान, पवनार येथे शिवसेना पदाधिकार्‍यांनी तेथे बसण्याची व्यवस्था केली. उद्धव साहेब 10 ते 15 मिनिटं येथे थांबून मार्गदर्शन करतील, असा पुकारा स्थानिक नेत्यांकडून देण्यात आला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. जसजशी वेळ जवळ येत होती तसतशी कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली. महिला आघाडीच्या पदाधिकारी साहेबांचे औक्षवण करण्यासाठी थाळी सजवून होत्या. साहेब येताच औक्षवण करू, अशी तळमळीची इच्छा महिला पदाधिकार्‍यांची होती. काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी जणू स्पर्धा लागल्याचे दिसून आले. मात्र, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ही सर्व आशा क्षणातच मावळली.
उद्धव ठाकरे हे वेळेच्या एक तास उशिरा आले. त्यामुळे सर्वांनी एकच गर्दी केली. फोटोसेशन सोडा औक्षवणही न करता काही जणांच्या हातून स्वागताचे बुके घेऊन एक मिनिटातच यवतमाळच्या दिशेने रवाना झाले. कार्यकर्त्यांना दहा ते पंधरा मिनिटं मार्गदर्शन करणार असल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले होते. मात्र, साहेब एक मिनिटातच निघून गेल्याने अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, सहसंपर्क प्रमुख रविकांत बालपांडे, जिल्हा प्रमुख अनिल देवतारे, जिल्हा प्रमुख प्रशांत शहागडकर, जिल्हा संघटीका संगीता कडू, सेलूच्या नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, उत्तम आयवळे, निलेश बेलखेडे, प्रफुल्ल भोसले, भालचंद्र देेवरुखकर, रमेश कांबळे, भारत चौधरी, यांच्यासह काँग्रेस नेते शेखर शेंडे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!