🔥ज्येष्ठ पत्रकार गणेश खडसे यांची ‘दै. साहसीक’च्या यवतमाळ जिल्हा प्रतिनिधीपदी नियुक्ती
यवतमाळ -/ पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात दोन दशकांपासून निर्भीड लेखणीच्या जोरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार गणेश खडसे यांची ‘दैनिक साहसीक’च्या यवतमाळ जिल्हा प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘दै. साहसीक’चे मुख्य संपादक रवींद्र कोंटबकर यांनी ही अधिकृत घोषणा केली असून, या नियुक्तीमुळे यवतमाळच्या वृत्तपत्र वर्तुळातून त्यांचे जोरदार स्वागत होत आहे.
गणेश खडसे यांनी आपल्या प्रदीर्घ २० वर्षांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘दैनिक पुण्यनगरी’मधून केली. त्यानंतर ‘दैनिक देशोन्नती’मध्ये त्यांनी सर्वाधिक काळ कर्तव्य बजावत पत्रकारितेचा एक वस्तुपाठ घालून दिला. या कार्यकाळात सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, महसूल आणि वनवृत्ताशी संबंधित अनेक धडक व खोचक बातम्या प्रसिद्ध करून त्यांनी व्यवस्थेला जाब विचारला. संवेदनशील विषयांना वाचा फोडतानाच, तळागाळातील प्रश्नांवर प्रभावी मांडणी करणारे धडाडीचे पत्रकार म्हणून त्यांचा जिल्ह्यात मोठा दबदबा राहिला आहे.
रोखठोक आणि धडाडीच्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘दै. साहसीक’ची धुरा आता खडसे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आल्याने जिल्ह्याच्या पत्रकारितेला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल राजकीय, सामाजिक आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.