डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला येथे शिवार फेरी आयोजन
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाद्वारे आयोजित शिवार फेरी आणि थेट पीक प्रात्यक्षिके अनुभव शेतकऱ्यांसाठी उत्तम संधी
डॉ .पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून यावर्षी विद्यापीठ शिवार फेरी दि. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली असून उद्घाटन समारंभ २९ सप्टेंबर,२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रस्तावित आहे.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नितीन गडकरी,मंत्री, रस्ते,वाहतूक आणि महामार्ग,भारत सरकार यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे तसेच या प्रसंगी मा.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री ,अकोला तसेच ना. धनंजय मुंडे,कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य तथा प्रतिकुलपती (कृषि विद्यापीठे) प्रामुख्याने उपस्थितीत राहणार आहेत. सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अधिपत्याखाली करण्यात येणार आहे.
या शिवार फेरी तसेच थेट पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकरी, संशोधक, धोरणकर्ते आणि उद्योग भागधारकांना ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, अत्याधुनिक कृषि पद्धतींबद्दल जाणून घेण्यासाठी आणि शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतींची खात्री करून पीक उत्पादकता वाढवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे असे असून या तीन दिवसीय शिवार फेरी मध्ये विविध वैशिष्ट्य पूर्ण बाबींचा समावेश असणार आहे. या दरम्यान २२० प्रगत खरीप पीक उत्पादन तंत्रांचे २० एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट प्रात्यक्षिके (उदा. तृणधान्य, कडधान्य, कापूस, सोयाबीन, भाजीपाला, फळपिके, फुलपिके, चारा पिके, धान पिके आणि त्यांचे तंत्रज्ञान इत्यादी). तसेच १६ खाजगी कृषी निविष्ठा कंपन्यांची थेट प्रात्यक्षिके आणि विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागांचे ११०० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तीन दिवसा मध्ये महाराष्ट्रातील ५०००० शेतकरी बांधवांचा सहभाग अपेक्षीत आहे. या दरम्यानआपल्या प्रदेशातील कृषी क्षेत्रा समोरील आव्हाने आणि संधी यावर चर्चा सत्राचे देखील आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून जिल्हानिहाय कार्यक्रम सुनिश्चित करण्यात आला असून, वर्धा जिल्ह्याकरीता शनिवार दि. ३० सप्टेंबर, २०२३ हा दिवस नियोजित करण्यात आलेला आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बंधू व भगिनी यांनी शिवार फेरी करिता या दिवशी व्यक्तीशः वा समूहाने येऊन प्रत्यक्ष संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. डॉ. धनराज उंदिरवाडे, संचालक (विस्तार शिक्षण) व मा. डॉ. जीवन कतोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, जिल्हा वर्धा यांनी केले आहे.
सागर झोरे सहासिक न्यूज-24