दहेगाव (मिस्कीन) येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह प्रशासनाच्या तत्परतेने थांबविला.

0

🔥दहेगाव (मिस्कीन) येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह प्रशासनाच्या तत्परतेने थांबविला.

वर्धा -/ दि.२८.०४.२०२६ दहेगाव (मिस्कीन) गावातील अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे व तातडीच्या हस्तक्षेपामुळे यशस्वीरित्या थांबविण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दहेगाव येथील अल्पवयीन बालिकेचा विवाहदिनांक २९.०४.२०२६ रोजी वर्धा येथील युवकासोबत ठरविण्यात आला होता. याबाबतची गोपनीय माहिती दिनांक. २७.०४.२०२६ रोजी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झाल्यानंतर मा. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मा. तृप्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पथक गठीत करून प्रतिबंधात्मक कार्यवाही करिता तत्काळ घटनास्थळी पाठविण्यात आले.सदर पथकामध्ये महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन, पोलीस विभाग तसेच स्थानिक प्रशासन यांचा समावेश होता. महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका तथा सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी श्रीमती जोत्सना बोरकुटे यांनी पालकांकडून बालविवाह न करण्याबाबतचा जबाबनामा घेतला.यावेळी संरक्षण अधिकारी वैभव राउतराय, चाईल्ड हेल्प लाईनचे प्रकल्प समन्वयक आशिष मोडक, पोलीस स्टेशन सावंगी येथील पोलीस कर्मचारी संजय पटले व राहुल नागपुरे, अंगणवाडी सेविका सुमन कन्नाके, पोलीस पाटील आशिष मिस्कीन तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे संतोष डोणे, मधुरी थूल व वैभव भांदककर, ग्रामपंचायत कर्मचारी अमोल वानखेडे उपस्थित होते.

कुटुंबियांसोबत संवाद साधताना बालिकेचे वडील नसल्यामुळे व मुलीबद्दल असुरक्षिततेची भावना असल्यामुळे तिचा लवकर विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे चर्चेत स्पष्ट झाले. यावेळी चाईल्ड हेल्प लाईन वर्धाचे प्रकल्प समन्वयक आशिष मोडक यांनी कुटुंबियांचे समुपदेशन करून बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच कायदेशीर परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ अंतर्गत बालविवाह हा दंडनीय गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

प्रशासनाच्या समजावणीमुळे कुटुंबीयांनी विवाह थांबविण्यास सहमती दर्शविली. यानंतर बालिकेच्या शिक्षण व सुरक्षिततेस प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बालिकेला बाल कल्याण समिती, वर्धा येथे हजर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील कार्यवाही बाल कल्याण समितीमार्फत करण्यात येणार आहे.

सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्धा मा. तृप्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, संरक्षण अधिकारी वैभव राउतराय, चाईल्ड हेल्प लाईनचे प्रकल्प समन्वयक आशिष मोडक, ग्रामपंचायत दहेगाव (मि.) ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर गंगावणे यांच्या समन्वयाने यशस्वीरित्या पार पडली.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ नुसार अशा प्रकरणांमध्ये बालिका व महिलांवर कारवाई केली जात नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. आईने मुलीचे भविष्य घडविण्याकरिता प्रयत्न करावे, बालविवाहमुळे अल्पवयात मातृत्व लादले जाते, शारीरिक, मानसिक त्रासाला पुढे जाव लागते, मुलींना शिक्षण व स्वावलंबनाची संधी देणे आवश्यक आहे. अशा घटना आढळल्यास महिला व बाल विकास विभागाच्या चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मा. तृप्ती चव्हाण यांनी केले आहे.

             गणेश रेंगे साहसिक         News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!