हिंगणघाट /जेथे ज्ञानाचा सागर संचित करून वैचारिक भूक भागविल्या जाते अशा ग्रंथालयाला दिलेले दान हेच खरे परोपकारी ठरणारे दान आहे या भावनेतून वाचनप्रेमी आणि स्थानिक डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालयाचे पर्यवेक्षक दिनेष वाघ यांनी श्रेयस वाचनालयाला मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून बारा पुस्तकांची भेट दिली.त्यात चरित्र ,पर्यावरणविषयक पुस्तके आणि वैचारिक पुस्तकांचा समावेश आहे.श्रेयस वाचनालय अनेक वर्षांपासून वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आणि वाचकनिष्ठ समाज निर्मितीसाठी अव्याहत प्रयत्न करीत आहे. सामाजिक ,भावनिक आणि मानसिक दृष्ट्या व्यक्तीला परिपक्व होण्यास वाचन मदत करीत असते या संकल्पनेतून “ग्रंथ तुमच्या दारी” , “वाचक मेळावे” इत्यादी श्रेयस वाचनालयाने राबविलेले उपक्रम स्तुत्य आणि प्रशंसनीय आहेत.ग्रंथप्रेमी दिनेश वाघ यांनी अमुल्य अशी ग्रंथ भेट श्रेयस वाचनालयाला दिल्याबद्दल श्रेयसचे अध्यक्ष प्रा.चंद्रकांत नगराळे आणि वाचनालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.