देवळी / वर्धा जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुक प्रतिबंध कामी राहूल कर्डीले जिल्हाधिकारी वर्धा यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना कठोर कारवाई करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.जिल्हाधिकारी यांचे निर्देशान्वये वर्धा जिल्ह्यातील सर्व उपविभाग व तालुक्यांत तपासणी नाका तसेच भरारी पथक स्थापन करणेत येऊन अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यात येत आहे.तसेच ७ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास रोजी तहसिलदार दत्तात्रय जाधव देवळी यांनी व त्यांचे भरारी पथका समवेत आंजी अंदोरी- देवळी मार्गावर प्राप्त माहीतीनुसार कारवाई करतांना मौजा आंजी जवळ रेती वाहतुक करणारे ५ टिप्पर जप्त करण्यात आले. तसेच मौजा वाटखेडा येथे अनधिकृत रेती वाहतुक करणारे २ टिप्पर जप्त करून तहसिल कार्यालय देवळी येथे जमा करण्यात आले.काही दिवसापुर्वीच तहसिल कार्यालय देवळी यांचे पथकाने मौजा आंजी व मौजा आपटी,वाघोली येथे कारवाई करत अनधिकृत रेती वाहतुक करणारे ४ ट्रॅक्टरवर कारवाई करत जप्त करण्यात आले आहे.सर्व जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे निर्देशानुसार जिल्हयात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर मोठया प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे.