देवळी : दोन दिवसापूर्वी शासनाने कापसाचे आधारभूत दर जाहीर केले आहे.त्यामध्ये प्रथम क्रमांकाच्या कापसाला ७०२० रुपये प्रतिक्विंटल तर दुय्यम दर्जाच्या कापसाला ६६३० रुपये भावाने मार्केट यार्ड मध्ये कापसाची विक्री होईल असे जाहीर केल्याने शेतकऱ्यांनी आपले कापूस मोठ्या प्रमाणात मार्केट यार्ड मध्ये आणले होते.परंतु कापूस घेणाऱ्या व्यापाऱ्यांनी मात्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत दरात कापूस घेण्यात असमर्थता दर्शविली त्यामुळे देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये एक गोंधळ उडाला होता. त्यामुळे दुपारपर्यंत कापूस खरेदी बंद होती या प्रकरणामध्ये देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी,कापूस पणन महासंघाचे अधिकारी, व शेतकरी, आणि व्यापारी यांच्यामध्ये एका दिवसासाठी तोडगा निघून कापूस खरेदीत सुरुवात झाली होती.परंतु कापूस व्यापाऱ्यांचे म्हणणे होते की शासनाने जाहीर केलेले कापसाचे आधारभूत दरात कापूस खरेदी करणे आम्हाला शक्य नाही तर सी सी आय ने शासनाच्या आधारभूत दरात कापूस खरेदी करावा परंतु सीसीआय शेतकऱ्यांचे कापूस घेण्याकरिता पहिले नोंदणी व नंतर अनेक प्रकारची कागदपत्र मागतात व ते पैसे थेट बँकेत जमा करतात व बँक ती रक्कम कर्ज असलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याच्या खात्यातून कापून घेतात व त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी सीसीआयला कापूस देण्यास टाळतात.त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालेला आहे शासनाने दिलेल्या आधारभूत दरातच कापूस विकायचा आहे परंतु तो सीसीआयला देण्यास तयार नाही आणि व्यापारी शासनाच्या आधारभूत दरात कापूस घेण्यास तयार नाही. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार वरील कारणांमुळे देवळीतील कापूस खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये बंद झालेली आहे आता शेतकऱ्याने शासनाच्या हमीदरात कापूस कुठे विकावा असा प्रश्न बळीराजासमोर येऊन पडला आहे.तरी शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ते त्वरित सोडवावा अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहे.