देवळी /सिलिंडरने अचानक पेट घेतल्यामुळे महिला जखमी झाली.वायुगळतीमुळे घरातील इतर वस्तूंनी आग पकडली.तसेच वेळीच उपायोजना झाल्याने मोठा अनर्थ टळला.ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास देवळी शहरात घडली.तसेच देवळी येथील वॉर्ड क्र. २, आंबेडकर नगर, देवळी येथील मुनीरखाँ मजीदखाँ पठाण यांच्या घरी दुपारी २ वाजताच्यादरम्यान त्यांची पत्नी सलीमुन्नीसा वय ५५ वर्ष या स्वयंपाक करीत असताना सिलिंडरने अचानक पेट घेतला.सलीमुन्नीसा यांच्या साडीने पेट घेतल्याने त्यांचे दोन्ही पाय भाजले.त्यांनी ओरड केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझविली.त्याचवेळी घरात लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.उलट स्वयंपाक घरातील साहित्य शेगडी,रेग्युलेटर, धान्य व घरगुती वस्तू जळून नुकसान झाले.घटनेची माहिती देवळी नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला देण्यात आली.अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले व काही वेळात आग आटोक्यात आली.अग्निशमन दल येण्यापूर्वी नागरिकांनी बरेच प्रयत्न केले; पण त्यात यश आले नाही.यामध्ये अंदाजे ५० हजारांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.या घटनेची तहसील कार्यालयाला माहिती देत तक्रार देण्यात आली.तलाठ्यामार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.सिलिंडर व रेग्युलेटर इंडियन कंपनीचे असल्याचे सांगण्यात आले.त्याच दिवशी गॅस एजन्सीकडून हे सिलिंडर आणून देण्यात आले होते. देवळी अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने आग विझविण्यात आली व सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.जर सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी चर्चा आहे.