पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘कारगिल गौरव’ पुरस्काराने सन्मानित
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/वर्धा:
पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांनी जय महाकाली शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे निर्माण करुन असंख्य गरीब मुला मुलींना अत्यंत माफक दरात शिक्षण शुल्क आकारून शिक्षणाची संधी निर्माण करुन दिली. तसेच आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव समाजातील तळागळातील असंख्य गरीब व गरजुंना मदत केली आहे. या शिक्षण संस्थेतून जवळपास ४००० च्या वर जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून आज ते उच्च पदावर कार्यरत आहेत. ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांचा तसेच शहीद कॅप्टन विक्रम बत्रा व शहीद कॅप्टन उन्नीकृष्णन यांच्या माता पित्याचा सत्कार जय शिक्षण संस्थेद्वारा करण्यात आला. त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना नुकतेच कारगिल गौरव या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये अब्दुल गफ्फार झरगर, सहाय्यक आयुक्त, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, कारगिल, फिरोज अहमद खान, अध्यक्ष, सीईसी कारगिल, संतोष सुखदेवे, जिल्हाधिकारी, कारगिल, अनायत अली चौधरी, पोलीस अधीक्षक, कारगिल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्काराला उत्तर देताना पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री म्हणाले कि, माता महाकालीच्या कृपेने मी राजकारणापासून अलिप्त होऊन समाज व शैक्षणिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. जम्मू काश्मीर मधील वंडरवन येथे मी जाऊन आलो असता सीमावर्ती भागातील प्रभावित कुटुंबातील १० मुला मुलीचे पालकत्व स्वीकारून त्यांना निशुल्क शिक्षण देण्याची जबाबदारी सामाजिक उत्तरदायित्वातून स्वीकारलेली आहे. येथे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेकरिता देश विदेशातून लोक येतात, यामध्ये प्रथम येणान्यास १ लाख रुपयाचे बक्षीस सरहद संघटना यांना देण्याची घोषणा करण्यात आली.
या प्रसंगी कारगिल युद्धाच्या इतिहासावर प्रकाश टाकताना पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री म्हणाले की, कारगिल शहर जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून २०५ किमी अंतरावर भारत-पाक आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. हिमालयाच्या इतर भागात प्रमाणे कारगिलमध्येही थंड वातावरण असते. उन्हाळा हा सौम्य तर हिवाळा अतिशय दीर्घ व कडक असतो व बऱ्याचदा तापमान ४० °C पर्यंतही उतरू शकते. राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६० किलोमीटरच्या पट्ट्यातच साधारणपणे घुसखोरी केली. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत.
फेब्रुवारी, इ.स. १९९९मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले. पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या व थांगपत्ता लागू न देता पार पाडली. यांतच भर म्हणजे, भारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची माहिती अजिबात मिळाली नाही. मेच्या दुसऱ्या आठवड्यात स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली. त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवली. तिच्यावर हल्ला करण्यात आला व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले. अशा रितीने कारगिल येथे युद्ध सुरू झाले आहे यावर शिक्कामोर्तब झाले. पाकिस्तानने एकूण सुमारे ९३० ते २०० चौरस किलोमीटर प्रदेश ताब्यात घेतला होता. तर मुशर्रफ यांच्या मते १३०० चौरस किलोमीटर इतका प्रदेश ताब्यात घेण्यात आला होता. भारतीय सरकारने ‘ऑपरेशन विजय’ या नावाखाली कारगिलच्या युद्धासाठी कार्यवाही चालू केली.
त्यासाठी संख्येने मुळात सुमारे २,००,००० इतक्या फौजेचा आधार घेण्यात आला. परंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर युद्ध करणे शक्य नव्हते. त्यामुळे रेजिमेंटल व बटालियन पुरतीच कारवाई शक्य होती. अर्थातच फौजेची गणसंख्या २०,००० पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. अर्धसैनिक व वायुदल मिळून भारताने एकूण ३०,००० पर्यंत सैनिक कारगिलच्या युद्धात वापरले. घुसखोरांची संख्या पाकिस्तानी सूत्रांप्रमाणे साधारणपणे ५,००० होती. यांत पाकव्याप्त काश्मीरमधील तोफखान्यामधील सैनिकही समाविष्ट होते.
महामार्गाच्या जवळच्या चौक्यांवरील भारतीय आक्रमणांत टायगर हिल व तोलोलिंग शिखर या दोन चौकीवजा शिखरांवरील आक्रमणे नोंद घेण्याजोगी होती. यानंतर बटालिक व तुर्तुक या सियाचीन लगतच्या भागाला लक्ष्य करण्यात आले. यातील काही जागा गमावणे पाकिस्तानी संरक्षणाच्या दृष्टीने परवडणारे नव्हते. पॉईंट ४५९० व पॉइंट ५३५३ या त्यापैकी काही महत्त्वाच्या जागा होत्या. (या भागात शिखरांना नावे त्यांच्या उंचीप्रमाणे असतात). ४५९० हा महामार्गाला सर्वात जवळचा पॉइंट होता तर ५३५३ है युद्धातील सर्वात अधिक उंचीचे शिखर होते पॉइंट ४५९० वर १४ जून १९९९ रोजी भारतीय सेनेने ताबा मिळवला व युद्धाचे पारडे हळूहळू भारताच्या बाजूने झुकू लागले. याच शिखराच्या ताब्यासाठी भारतीय सेनेला सर्वाधिक मनुष्यहानी सोसावी लागली.
भारताने जेव्हा महामार्गालगतच्या महत्त्वाच्या चौक्यांवर ताबा मिळवला तेव्हा भारतीय सैन्याने घुसखोरांना नियंत्रण रेषेपलीकडे पिटाळायचे धोरण आखले. तोलोलिंगची लढाई व टायगर हिलची लढाई ही या युद्धातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. अनेक शूर भारतीय अधिकारी व सैनिक या लढायांमध्ये मरण पावले. तोलोलिंगच्या लढाईनंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले टायगर हिलवर उशीरा नियंत्रण मिळवले गेले तरी ती सर्वात महत्त्वाची लढाई होती असे मानतात. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्न झाले. पाकिस्ताननेही खंदक वगैरे खोदून भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजावयाला लावले. सरतेशेवटी ४ जुलै रोजी टायगर हिल भारताच्या ताब्यात आली. या लढाईत भारताचे ५ सैनिक व पाकिस्तानचे १० सैनिक मृत्युमुखी पडल्याचे कळते भारताने इ.स. १९९९ सालच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या लढाया केल्या व अनेक जागा ताब्यात मिळवल्या युद्धात ५२७ भारतीय जवान शहीद झाले तर २७०० पाकिस्तानी सैनिक मरण पावले.
कारगिल युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा आपल्या एका साथीदाराला वाचवताना शहीद झाले होते. असे म्हणतात की, शत्रूच्या गोळीबाराच्या वेळी त्यांनी आपल्या साथीदाराला शेवटच्या शब्दांत सांगितले होते की, ‘तू जा. तुम्हाला बायका आणि मुले आहेत. कारगिल युद्धातील कॅप्टन विक्रम बत्रा यांच्याशी संबंधित एक प्रसंग शेअर करताना त्यांच्या साथीदाराने सांगितले की, जेव्हा बत्रा शत्रूंना गोळ्यांनी भाजून घ्यायचे….
तेव्हा ते ‘ये दिल मांगे मोर’ म्हणायचे. 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र,
भारतातील सर्वोच्च आणि सर्वात प्रतिष्ठित शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुभेदार संजय कुमारकारगिल युद्धातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्राने सन्मानित झालेले सुभेदार संजय कुमार आजही ते दृश्य आठवले की रक्ताच्या उकळ्या फुटतात संजय कुमार हे कारगिलमधील मॉस्को व्हॅल्यू पॉइंटवर तैनात होते. इथे शत्रू वस्न सतत हल्ले करत होते. संजय यांनी 11 पैकी दोन सहकारी गमावले होते तर आठ जण गंभीर जखमी झाले होते. अशा परिस्थितीतही संजयने शत्रूंना कडवी झुंज दिली आणि एक वेळ अशी आली की त्याच्या रायफलच्या गोळ्या संपल्या. तीन वेळा गोळी झाडली असूनही संजय कुमार आपल्या ध्येयात यशस्वी झाले. एका चकमकीत त्यांनी शत्रूचे तीन सैनिकही मारले.
कॅप्टन मनोज कुमार यांनी आपल्या बटालियनचे नेतृत्व करत कुकरयांग आणि जबरटॉप ही शिखरे दोन महिन्यांत पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केली. यानंतर त्याला खोलबार ताब्यात घेण्याची जबाबदारी देण्यात आली. हे काम सर्वात कठीण मानले जात होते. खोलबारच्या दिशेने जाताना त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या गोळ्यांचा सामना केला. जखमी असूनही त्यांनी पाकिस्तानी लष्कराचे 4 बंकर उद्ध्वस्त केले. एवढेच नाही तर त्यांनी शत्रू सैन्याच्या अनेक सैनिकांना ठार केले. या परिस्थितीतही त्यांनी सहकाऱ्यांना कवच दिले. ३ जुलै १९९९ रोजी ते शहीद झाले. त्यांच्या शौर्याला सलाम करून त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक प्रदान करण्यात आले.
ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांना कारगिल युद्धादरम्यान दाखविलेल्या अदम्य धैर्याबद्दल परमवीर चक्र हा सर्वोच्च भारतीय लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला. ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव हे कारगिल युद्धादरम्यान कनिष्ठ आयोग अधिकारी (JCO) होते. सध्या ते सुभेदार मेजर आहेत त्यांनी 16 गोळ्या लागूनही शत्रूला कडवी झुंज दिली. ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांना वयाच्या 19 व्या वर्षी परमवीर चक्र मिळाले. योगेंद्र सिंह यादव हे हा सन्मान मिळवणारे सर्वात तरुण सैनिक आहेत.