पंतप्रधान आवास योजनेची मुदत संपणार असल्याने सर्वसामान्यांचे स्वप्न अधांतरीच!
गजेंद्र डोंगरे / मदनी आमगाव:
योजना सुरू ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणेने व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा .अशी मागणी संभाजी ब्रिगेड यांचे कडून होत असून अतिसामान्य आणि सामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान आवास योजना ३१ मार्च २०२२ रोजी संपणार आहे. यामुळे बऱ्याच गरीब लोकांचा हिरमोड होणार आहे.
सद्यस्थितीत महागाईच्या भडक्याने सर्वसामान्य माणूस होरपळत आहे. दोन वेळेसाठी जेवणाची तजवीज करताना तारेवरची कसरत करावी लागते. महागाई वाढत असतानाच रशिया युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. यामुळे महागाई पुन्हा वाढण्याचे संकेत आहेत. अशातच आता ३१ मार्चपासून पंतप्रधान आवास योजना संपुष्टात येणार असल्यामुळे सामान्य व अतिसामान्य जनतेच्या स्वप्नातील हक्काचे घर हे दिव्य स्वप्न ठरणार आहे.
बांधकाम साहित्याचे भाव सध्या गगनाला भिडले असुन घर बांधकामासाठी लागणारे लोखंड, सिमेंट, रेती, गिट्टिच्या दरातही वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२२ ला पंतप्रधान आवास योजना बंद होत असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांमध्ये निराशा व्यक्त होत आहे. बऱ्याच ठिकाणी या योजनेमध्ये राजकारण होताना दिसून येते. पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहतात, तर रगड जमीन जुमले असणाऱ्यांना या योजनेस पात्र ठरविले जात आहे, असे असले तरी ही योजना सुरू राहणे गरजेचे आहे. पात्र लाभार्थ्यांना या योजनेत सामावून घेण्यासाठी मुदत वाढ करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने उपरोक्त निर्देशित तारीख पंतप्रधान आवास योजनेसाठी वाढवून दिल्यास पंतप्रधान घरकुल योजनेचा अनुशेष भरून निघेल व त्यासाठी संबंधित यंत्रणेने व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या योजनेची कालमर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे मिलिंद ढेवले यांनी केली आहे.