पाकिस्तानी गँगस्टरच्या कथित नेटवर्कप्रकरणी एटीएसची वर्ध्यात कारवाई

0

🔥पाकिस्तानी गँगस्टरच्या कथित नेटवर्कप्रकरणी एटीएसची वर्ध्यात कारवाई.

🔥एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात; मोबाईल व सोशल मीडिया व्यवहारांची तपासणी.

वर्धा -/ पाकिस्तानमध्ये बसून कार्यरत असल्याचा आरोप असलेल्या गँगस्टर व कथित आयएसआय हँडलर शहजाद भट्टीच्या कथित नेटवर्कविरोधात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) राज्यभर सुरू केलेल्या कारवाईचा धागा शुक्रवारी वर्ध्यापर्यंत पोहोचला. नागपूर आणि वर्धा एटीएसच्या संयुक्त पथकाने शहरातील एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ६.३० वाजता एटीएसच्या आठ सदस्यीय पथकाने वर्धा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सुमारे ४० वर्षीय व्यक्तीची चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात संबंधित व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
तपास यंत्रणांच्या सूत्रांनुसार, पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या शहजाद भट्टीच्या कथित नेटवर्कचे धागेदोरे देशातील विविध राज्यांपर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक प्रलोभने व इतर आमिषे दाखवून काही व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती तपासात समोर येत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर एटीएसकडून विविध राज्यांत समन्वित कारवाई सुरू आहे.
दरम्यान, वर्ध्यात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका व्यक्तीलाही चौकशीसाठी आणण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दोघांचा कथित नेटवर्कशी नेमका काय संबंध आहे, याबाबत तपास सुरू असून अधिकृतरीत्या कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
शुक्रवारी उशिरापर्यंत एटीएसचे पथक दोन्ही संशयितांची चौकशी करत होते. त्यांच्या मोबाईल फोनमधील माहिती, कॉल डिटेल रेकॉर्ड, सोशल मीडिया व्यवहार आणि अन्य डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत एटीएसने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच या कारवाईबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

         ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!