सिंदी (रेल्वे) /चारचाकी वाहनाने काळाबाजार करण्यासाठी अवैधरीत्या पेट्रोलची वाहतूक करतांना कुख्यात पेट्रोल माफिया इमरान लियाकत अली सैय्यद वय ३२ वर्ष राहणार खडकी याला सिंदी पोलिसांनी रंगेहात पकडले.याप्रकरणी पोलिसांनी ७ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध सिंदी पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सिंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका चारचाकी वाहनाने आरोपी सिंदी शहरात अवैधरीत्या पेट्रोलची खेप पोहचविण्यासाठी येत असल्याची माहिती सिंदी पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने ठाणेदार वंदना सोनूले यांनी १८ फेब्रुवारी सायंकाळी ९ वाजताच्या सुमारास शहरातील बसस्थानकावर नाकाबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असता एक जुनी इनोवा कंपनीची MH-२७-BE- ७४०० क्रमांकाची चारचाकी वाहन अडवून तपासणी केली असता वाहनाच्या मागच्या डिक्कीमध्ये प्लॅस्टिकच्या ८ डबक्यांमध्ये प्रति २० लिटर किंमत १३ हजार ७२० पेट्रोल ज्वलनशील पदार्थ आढळून आला. वाहनाचा चालक आरोपी इमरान लियाकत अली सय्यद राहणार खडकी तालुका सेलू जिल्हा वर्धा यास पेट्रोल खरेदी पावती तसेच परवानाबाबत विचारले असता आरोपी इमरान याने उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलिसांनी पेट्रोलने भरलेल्या प्रति २० लिटर ८ डबक्या व इनोवा कंपनीची चारचाकी वाहन किंमत ७ लाख रुपये असा एकूण ७ लाख १३ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला.
आरोपीने काळाबाजार करण्यासाठी ज्वलनशील पदार्थ पेट्रोलची वाहतूक केल्या प्रकरणी सिंदी पोलिसांनी आरोपी इमरान लियाकत अली सय्यद वय ३२ वर्ष राहणार खडकी यास अटक केली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कायद्याच्या कलम ३,७ नुसार कारवाई केली आहे.या कारवाईमुळे पेट्रोल व डिझेल माफियांचे धाबे दणाणले असून त्यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशानुसार ठाणेदार वंदना सोनूले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई संजय भगत, शीतल मुन, प्रशांत श्रीवास्तव, कैलास हरणे, प्रदीप मस्के, आनंद भस्मे, उमेश खामनकर, शालिनी नेहारे, प्रीती चन्ने, प्रगती धोंगडेसह आदींनी केली आहे.