बोर महोत्सवात अनेकांनी चाखली व्यंजनाची गोडी..76 प्रजातीचे बोरांचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांनी लुटला आनंद, मगन संग्रहालयाचे आयोजन.
गिरड : गावरान मेवा म्हटलं की सर्वांनाच लहानपण आठवते.मात्र नवी पिढी याविषयी अनभिज्ञ आहे. रानमेव्याचे आरोग्यदायी महत्व रुजविण्यासाठी गिरड येथे आयोजित गावरान बोरं महोत्सव नव्यापिढीसाठी वेधक ठरले.या बोर महोत्सवात 36 शेतकरी, महिलांनी 76 प्रकारच्या बोर प्रदर्शनीत प्रदर्शीत केले होते.तर परिसरातील महिलांनी बोरापासून तयार केलेली व्यंजने अनेकांनी चाखून गोळी अनुभवली. बोरांवर आधारित कविता ऐकून उपस्थितही भारावले, विद्यार्थ्यांना बोरं महोत्सवाचे आकर्षण ठरले.समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथील मगन संग्रहालय समितीच्या नैसर्गिक शेती विकास केंद्रात २ फेब्रुवारीला गावरान बोर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या बोरं महोत्सवाचे उद्घाटन गिरड ग्रामपंचायतीचे सरपंच राजु नौकरकर,मगन संग्रहालयाच्या अध्यक्षा डॉ विभाताई गुप्ता,मनीषा पेंटे, प्रीतमराव व्यापारी गुरुजी,माजी जिल्हा परिषद सदस्य फकीरा खडसे, दिनकराव गिरडे,सुषमाताई दुबे, सामाजिक कार्यकर्ते बबनराव दाबणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
गिरड परिसरात गावरान फळांची विविधता निकोप, निरामय आरोग्याला चालना देणारी आहे. ही रानमेव्याची समृद्धी आणि समृद्ध वारसा वृद्धींगत करून नव्या पिढीकडे सोपविणे, काळाची गरज आहे.या नव्या पिढीला जागृत करण्यासाठी गावरान बोर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मगन संग्रहालयाच्या अध्यक्षा डॉ. विभा गुप्ता उदघाट्न प्रसंगी बोलतांना म्हणाल्या.
बोरं उत्सावाची सुरुवात प्रा. अभिजित डाखोरे यांनी रानबोरावर लिखित कविता सादरीकरनातून करून बोरांचे आरोग्य विषयक महत्व विषद केले.यावेळी गिरड परिसरातील शाळेतील 135 विद्यार्थ्यांनी गावरान विषयावर निबंध सादर केले होते.यातील पूर्वा भिसेकर या विद्यार्थ्यांनी निंबध वाचन सादर केले.गिरडच्या जिल्हा परिषद शाळेतील गौरव राऊत, वेदांत बावणे तर विकास विद्यालयातील शैलेश घोडमारे, संजीवनी महल्ले, नामदेव कापसे, भारती गायकवाड यांच्या निबंधाची निवड करण्यात आली.
गुरुकुल विद्या निकेतन शाळेतील श्रुती पुसदेकर, तृप्ती मोंढे, आराध्या दुबे, पूर्वा भिसेकर यांच्या उत्कृष्ट निबंध लेखनाची निवड करण्यात आली. तर 135 निबंध लेखन करणाऱ्या विद्यार्थांना शालेय कार्यक्रमात प्रोत्साहन देऊन गौरविण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाप्रसंगी घोषित करण्यात आले.
बोरं प्रदर्शनीत निवड झालेले नागपूर येथील जगदिश पाटील, महानंदा दमके, चंद्रकला बावणे, रमाबाई मसराम, मीना काटेखाये यांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.
निसर्ग कवी रंगनाथ तालवटकर यांनी कवितेच्या माध्यमातून रानमेव्याचे महत्व विषद केले.
निबंध स्पर्धा व बोरं प्रदर्शनी परीक्षण समितीचे प्रा. अभिजित डाखोरे, केशव डंभारे, चक्रधर भगत, कृषी परिवेक्षक मनोज गायधने यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
या गावरान बोर महोत्सवात बोर प्रदर्शनी, चर्चासत्र, मार्गदर्शन, संवाद, अनुभव कथन, पाककृती आदी कार्यक्रम पार पडले.
महोत्सवात समुद्रपुर तालुक्यासह नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील गावरान बोर व त्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध पदार्थांचे महिला बचत गटांनी 12 स्टॉल लावले होते.या महोत्सवात गुरुकुल विद्या निकेतन, विकास विद्यालय, प्राथमिक शाळेच्या विद्यार्थानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज/24 सिंदी रेल्वे