राज्यात क्रांती घडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे बंड – रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरेंचे प्रतिपादन
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/वर्धा:
राज्यात गेली अडीच वर्षे शिवसेना सत्तेत असूनही शिवसेनचे कार्यकर्ते व सामान्य नागरिकांचे कोणतीही कामे झाली नाही. कार्यकर्ते व सामान्य नागरिक तर सोडाच शिवसेनेचे आमदार मंत्र्यांना भेटण्यासाठी उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे जनतेच्या विकास कामासाठी पाठविण्यात आलेल्या फाईली तशाच पडुन राहत होत्या. जनतेची विकास कामे होत नव्हती. राज्याचा विकास थांबला होता. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी नाही तर राज्यात विकासाची क्रांती घडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. असे प्रतिपादन रोजगार हमी व राज्याचे फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केले. ते शिवसेना हिंदु गर्व गर्जना संपर्क यात्रे निमित्त वर्धेत आले असता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आयोजित सभेत बोलत होते.
मंचावर माजी मंत्री शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेश सराफ, जिल्हा प्रमुख गणेश इखार, जिल्हा संघटक संदीप इंगळे, माजी उपजिल्हा प्रमुख किशोर बोकडे, पवनारचे उपसरपंच राहुल पाटणकर,कामगार नेते प्रशांत रामटेके,अल्पसंख्यांक सेलचे आसिफ शेख,बोरगाव (मेघे) च्या ग्रामपंचायत सदस्या नीलीमा कटाईत, महिला आघाडीच्या माया गारसे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट तथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
मंत्री भुमरे म्हणाले की, शिवसेनेने भारतीय जनता पार्टीशी युती करून मते मागितली. त्यावेळी शिवसेनेचे ५६ व भाजपाचे १०६ आमदार निवडुन आले. परंतु, निवडणुका झाल्यानंतर ज्यांच्याशी आपले जमत नाही. त्यांच्याशी हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. यानंतर कोरोना मात्र केवळ एक बहाणा होता. सामान्य नागरिक, शेतकरी, शिवसेनेचे कार्यकर्ते, आमदार व मंत्र्यांची सुध्दा कामे होत नव्हती. यामुळे शिवसेना सामान्य नागरिकांपासून दूर जात होती. शिवसेना वाचविण्यासाठी व बाळासाहेब यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी बंड पुकारले नाही. ते मुख्यमंत्री होताच अतिवृष्टीधारक शेतक-यांना दोन एकरावरून तीन हेक्टर पर्यत दुप्पट मदत केली. वृध्द नागरिकांना एसटी बसमध्ये सवलत दिली. शक्य होईल तेवढे पेट्रोल व डिझेलचे दर कमी केले. ७५ हजार नोकरभर्तीची घोषणा केली. मी मंत्री होताच विहिंरींकरीता ३ लाखावरून ४ लाख रूपये अनुदान घोषित केले. यानंतरही शेतकरी व शेतमजुरांना शक्य ती मदत जाहीर करणार आहे, असे सांगत त्यांनी मुंबई येथे दसरा मेळाव्याला येण्याचे आवाहन त्यांनी केले.
माजी मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर म्हणाले की, हिंदूत्वाचा गजर सामान्य नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी ही संपर्क यात्रा काढण्यात आली आहे. अडीच वर्षात पक्षाची मोठी हानी झाली आहे. कार्यकर्त्यांना न्याय व बळ मिळाले नाही. सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण शिवसेना तळागाळापर्यत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा सह संपर्क प्रमुख राजेश सराफ यांनी विचार व्यक्त करीत संघटना मजबुत बनविण्यासाठी प्रयत्न राहणार असून जिल्हा शिवसेनामय करण्याचे आश्वासन दिले.
प्रास्तविक जिल्हा प्रमुख गणेश इखार यांनी केले.संचालन दिलीप भुजाडे यांनी केले.आभार नितीन देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला शिवसैनिक, महिला व सामान्य नागरिकांची उपस्थिती होती.