हिंगणघाट / येथील तहसीलदार सतीश मासाळ यांनी रेती तस्करावर बडगा उगारला असून छापे व धाडसूत्र सुरू केले आहे.त्यांनी रेती तस्करांवर कारवाईला सुरुवात केली असून २१ फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास महसूल पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील मौजा कापसी येथील रेती घाटावर पहाटे गुप्तपणे धाड टाकून अवैधपणे रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ६ ट्रॅक्टर वर कारवाई केली.सदर ६ ही ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालय हिंगणघाट येथे जमा करण्यात आले.
सदर ट्रॅक्टर मालक हे राळेगाव जि. वर्धा येथील असल्याचे समजते. त्यांच्यावर प्रत्येकी १२३१००/- रु असा एकूण ७३८६००/- रु इतका दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सतीश मासाळ यांनी दिली.
सदर कारवाई मा. जिल्हाधिकारी. राहुल कर्डीले व तहसीलदार सतीश मासाळ यांचे मार्गदर्शनामध्ये नायब तहसीलदार सागर कांबळे,भलावी तलाठी सय्यद,बीमरूट,झोरे व खंडाते यांनी केली.
एकाच वेळी सहा ट्रॅक्टरवर कारवाई झाल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.
महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विशेष पथक निर्माण केले असून त्याद्वारे रेतीघाटाची नियमित तपासणी केली जात आहे.तसेच अवैध उत्खनन रोखण्याकरिता रेती घाटातील रस्त्यावर JCB मशीन च्या सहाय्याने खड्डे खोदून प्रतिबंध निर्माण केला आहे.