वर्ध्यात डोळ्यावर पट्टी,टेबलखाली हात शहरात मटक्याची उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे
क्राईम प्रतिनिधी/ वर्धा ;
अवैध धंद्यांना चाप लावून कायदा सुव्यवस्था टिकवणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य, मात्र याच कर्तव्यात कसूर होत आहे. मटका, जुगार याकडे होणारे वर्धा जिल्हा पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आणि अर्थपूर्ण वाटाघाटींमुळेच शहरात अवैध धंदे फोफावले आहेत. नागरिकांच्या तक्रारींनंतरही अवैध धंद्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना छुपे संरक्षण देण्याचेच काम पोलिसांकडून सुरू आहे, त्यामुळेच राजरोस मटका अड्डे सुरू असल्याचे आतापर्यंत झालेल्या कारवाईतून स्पष्ट झाले. यातील दोषींवर वरिष्ठ पोलिस अधिकारी काय कारवाई करणार याची चर्चा आता सुरू झाली आहे.
वर्ध्यात मागील काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी शहरातील मटका अड्डे चालवणाऱ्या सूत्रधारांवरच हल्लाबोल केला होता. मटका अड्डे बंद ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्याने काही काळ जिल्ह्यातील मटका अड्ड्यांवर शांतता होती. कुमार यांच्या बदलीनंतर मात्र छुप्या पद्धतीने मटका अड्डे सुरू झाले. गेल्या काही दिवसांत तर उघडपणे आणि वर्दळीच्या ठिकाणीही मटक्याच्या पाट्या आणि चिठ्ठ्यांचे खच पडल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ‘शांतता आहे’ असे उत्तर देऊन वेळ मारून नेली जात होती.
तीन महिन्यांपूर्वीच एका नगरसेवक महिलेने रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मटका अड्ड्यांची पोलखोल केली होती. पोलिसांनी त्यावेळी मटका अड्ड्यांवर कारवाई करण्यापेक्षा चेंगट वाल्या सोबत हात मिळवणी केली .
ही स्थिती शहरात सगळीकडेच आहे. आर्थिक वाटाघाटींमुळेच पोलिसांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. दर महिन्याला पोलिसांना लाखो रुपयांचा हप्ता पोहोच केला जातो, असे राम नगरातील अशोक मिश्रा यांनी एवढेच नाही तर पोलिसांच्या आशीर्वादामुळेच आम्ही हा व्यवसाय करू शकत आहे. सट्टा किंग मिश्रा याने सांगितले. त्यामुळेच पोलिसांचे मटका अड्ड्यांकडे दुर्लक्ष होत आहे. याशिवाय अवैध धंदेवाल्यांकडून पोलिसांना मोठ्या गिफ्टही मिळतात. एखाद्या महिन्यात हप्ता लांबल्यास कारवाईचा धाक दाखवला जातो. शहरात सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बिनबोभाट मटका अड्डे आजही सुरू आहेत. भाजी मार्केट गोल बाजार, आर्वी नाका, शिवपार्वती सभाग्रह च्या बाजूला, रेल्वे स्टेशन, इतवारा , पावडे चौक,
आदी परिसरात मोठ्या प्रमाणात मटका अड्डे सुरू आहेत. पान टपऱ्या, छोटी हॉटेल्स, लॉटरी सेंटर्स अशा ठिकाणी अड्डे सुरू आहेत. याशिवाय मोबाइलवरून मटका घेणे, उद्याने, रेल्वे स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी देखील ठराविक वेळेत मटका घेणारे बसतात. सर्वसामान्यांच्या नजरेत येणारी ही बाब पोलिसांच्या नजरेतून सुटूच शकत नाही, उलट पोलिसच या अवैध धंद्यांना संरक्षण पुरवतात.
पोलिसच आरोपीच्या पिंजऱ्यात
शहरातील अवैध धंदे सुरू राहण्यामागे पोलिसांचाच मोठा हातभार आहे. केवळ वरिष्ठांकडून आलेले कारवायांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी काही दिखाऊ कारवाया केल्या जातात. कागदोपत्री कारवाया दाखवून उद्दिष्टपूर्तीचा आनंद साजरा केला जातो. प्रत्यक्षात मात्र हप्ते घेऊन अवैध धंद्यांना मदतच केली जात असल्याने पोलिस आरोपीच्या पिंजऱ्यात पोहोचले आहेत.