वर्ध्यात दोन महिन्यांनंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव ; तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह
प्रतीनिधी /वर्धा :
वर्धा जिल्ह्यात आठ मार्च नंतर म्हणजेच 62 दिवसांनंतर कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. तिघांना कोरोना झाल्याचा अहवाल आला आहे. सेवाग्राम रुग्णालयातील डॉक्टर परिवार आहे. नुकतेच ग्वालियर येथून लग्नासमारंभ आटोपून वर्धेत आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा यु टर्न घेतल्याने आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सेवाग्राम येथील डॉक्टर त्यांची पत्नी आणि 18 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली. ते सध्या गृह विलगीकरणात आहेत. सेवाग्राम येथील डॉक्टर दाम्पत्य हे आपल्या मुली सोबत नुकतेच मध्यप्रदेशच्या ग्वालियर येथून आले होते. कोरोनाचे लक्षण दिसताच चाचणी केली असता अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तिघांपैकी दोघांनी कोरोना लसीचे दोन डोज घेतले आहेत. तर एकाने बूस्टर डोजही घेतला आहे. सध्या तीनही रुग्ण हे गृहविलगीकरणात असून त्यांना सौम्य लक्षणं आहेत.
वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 58 हजार 113 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 57 हजार 147 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे 1 हजार 351 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण, गेली दोन महिने कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. आता पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे. परंतु, तिन्ही रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत. घाबरण्यासारखं काही नाही, असं प्रशासनानं सांगितलंय.