विजय दिवस देशाच्या सैनिकांच्या शौर्य, पराक्रम, अदम्य धैर्य आणि बलिदानाची गाथा सांगतो,माजी एनसीसी अधिकारी दवंडे
रासेयो चित्रकला स्पर्धेत समृद्धी, आकाश, साक्षी, त्रुज्या यांना पुरस्कार
सिंदी रेल्वे: १६ डिसेंबर १९७१ च्या ऐतिहासिक विजयाचा आनंद आजही प्रत्येक देशवासीयाच्या मनात उत्साहाने भरतो. विजय दिवस देशाच्या सैनिकांच्या शौर्य, पराक्रम, अदम्य धैर्य आणि बलिदानाची गाथा सांगतो. या दिवशी भारताने पाकिस्तानचे दातखिळे केले होते, असे मत माजी एनसीसी अधिकारी अशोक दवंडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना पथक व रोव्हर रेंजर्स स्काऊटिंग द्वारे आयोजित विजय दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगर शिक्षण मंडळाच्या सहसचिव नीता टालाटुले, प्राचार्य विलास एखंडे, प्रा. उत्तम देवतळे, डॉ. सतीश थेरे व रोव्हर लीडर तथा रासेयो जिल्हा समन्वयक प्रा रवींद्र गुजरकर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने व ‘शहीदो की चिताओ पर खडी हुई स्वतंत्रता’ या देशभक्ती गीताने झाली. १६ डिसेंबर हा सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्याचा दिवस होय, आजचा तरुणांनी आपल्यासमोर मोठे ध्येय ठेवून समाजाचे व राष्ट्राची सेवा करावी असे प्रतिपादन अध्यक्षीय मार्गदर्शन करताना नीता टालाटुले यांनी केले.भारताने १९७१ मध्ये १६ डिसेंबर या दिवशी पाकिस्तान विरुद्धचे युद्ध जिंकले. पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी हातातील शस्त्र जमिनीवर ठेवून भारतासमोर बिनशर्त शरणागती पत्करली.या युद्धात भारतीय लष्कर, नौदल आणि वायु दलाने नेत्रदीपक कामगिरी केली. नौदलाने पाकिस्तानी बंदरावर क्षेपणास्त्र हल्ले करत अनेक बंदर उद्ध्वस्त केले होते. यानंतर भारतीय वायु दलाने पाकिस्ताच्या वायुदलाची आणि लष्कराचे कंबरडे मोडले होते. म्हणूनच दरवर्षी १६ डिसेंबर या दिवशी भारतात विजय दिवस (विजय दिन) साजरा करतात, असे विचार प्रास्ताविकातून प्रा. रवींद्र गुजरकर यांनी मांडले.‘1971 चे विजय शौर्य’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, या स्पर्धेत समृद्धी दाते यांनी प्रथम क्रमांक तर आकाश बुरुटे, साक्षी शेळके व त्रुज्या वाटकर यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.कार्यक्रमाचे संचालन समृद्धी दाते, मनोगत सुहानी चौधरी तर आभार प्रदर्शन वेदांत नागमोते यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता रचना वैद्य, तृप्ती बैलमारे, शुभांगी पायघन, रीना रोडे, समीक्षा नेवारे, रितिका अटेल, रोहिणी शेळके, धनश्री गिरडे, मेघा मुंगले, राधेय वरजे, साहिल मसराम, प्रतीक ढोक, मयूर पिणे व परेश झाडे यांनी अथक परिश्रम घेतले.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24