वि.सा. संघ व दाते स्मृती संस्थेद्वारे आदरांजली सभेचे आयोजन
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
विदर्भ साहित्य संघ वर्धा शाखा, यशवंतराव दाते स्मृती संस्था आणि निसर्ग सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक सुमती वानखेडे उपाख्य सुमती विराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थानिक आयटीआय टेकडीवरील ऑक्सिजन पार्कमध्ये स्मृतिवृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध संस्थांच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
निसर्ग सेवा समितीच्या परिसरात आयोजित या आदरांजली सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्रदीप दाते होते. प्रारंभी वि. सा. संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांनी भगिनी सुमतीच्या आठवणींना उजाळा दिला. सभेत वृक्षमित्र मुरलीधर बेलखोडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. किशोर वानखडे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख, समीक्षक डॉ. राजेंद्र मुंढे, परिवारातील राजेश इंगळे, संगीता इंगळे यांनी सुमती वानखेडे यांच्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेतला. दाते स्मृती संस्थेद्वारे दिला जाणारा अंजनाबाई स्त्रीवादी साहित्य पुरस्कार यापुढे सुमती वानखेडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. त्यांचे अप्रकाशित साहित्य येत्या काळात प्रसिद्ध करण्याचा तसेच नेत्रदान व देहदानाचा परंपराही कायम ठेवण्याचा मानस कुटुंबातील सदस्यांद्वारे व्यक्त करण्यात आला. दसवा, तेरवी, गोडजेवण अशा मरणोत्तर कर्मकांडाला नाकारत त्याऐवजी सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय वानखेडे व इंगळे तिगावकर परिवाराद्वारे घेण्यात आला.
यावेळी, सुमती वानखेडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलगा विराज आणि स्नुषा रिचा यांच्या हस्ते स्मृतिवृक्षाचे रोपण करण्यात आला. प्रारंभी डॉ. सायली इंगळे यांनी प्रार्थनागीत सादर केले. तर, युवाकवी आकाश टाले यांनी काव्यवाचन केले. ग्रामगीतेतील ओवींनी सभेची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला प्रबोधनकार सप्तखंजिरीवादक इंजि. भाऊ थुटे, राष्ट्रसंत साहित्याचे प्रचारक बा. दे. हांडे, वि. सा. संघाचे सहसचिव प्रा. पद्माकर बाविस्कर, संयुक्त कामगार कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत डकरे, आकाशदर्शन संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार वानखेडे, अ. भा. अंनिसच्या महिला जिल्हा संघटक डॉ. सुचिता ठाकरे, डॉ. शोभा बेलखोडे, सुनंदा वानखडे, महाराष्ट्र अंनिसचे सुनील ढाले, बहार नेचर फाउंडेशनचे उपाध्यक्ष दीपक गुढेकर, सचिव जयंत सबाने, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे अनिल देशमुख, कुटुंबातील जया इंगळे, सोनाली डोर्लीकर, वनश्री रमेश बोधनकर, अक्षय लेकरिया, आकाश दाते, रेयांश डोर्लीकर, ग्रंथपाल अनिता दिघीकर, प्रदीप जगताप, ॲड. दीपाली नाखले येळणे, अनिल देवतळे, दिलीप देठे, प्रफुल्ल द्रव्यकर, पांडुरंग धाबर्डे, गौतम फुलमाळी, के. जी. आखरे, एस. के. चरडे, यशवंतराव नलोडे, बाबाराव साखरकर, श्रीराम नौकरवार, धनराज कांबळे, बाबाराव भोयर, हरीश मन्ने, वसंत बहीरशेट, वसंत बाभूळकर, मयुर ढुमणे यांच्यासह स्नेहीपरिवाराची उपस्थिती होती.