सिंदीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा..
🔥 1 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त
🔥 शिक्षक व संचालकावर गुन्हा दाखल
🔥 ठाणेदार वंदना सोनूले यांची धडक कारवाई
सिंदी (रेल्वे) : शहराच्या मुख्य मार्गावर असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून शिक्षक व संचालकासह सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये एकूण 1 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैद्य व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सिंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहराच्या मुख्य मार्गावर सिंदी विशाल विविध कार्यकारी सोसायटी समोर असलेल्या बजरंग रामचंद्र पाटील यांच्या राहत्या घरी पैसे लावून हार-जीत चा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार वंदना सोनूले यांना मिळाली. सोनूले यांनी लगेच एक पथक तयार करून सायंकाळी अंदाजे 5 वाजताच्या सुमारास पंचासमक्ष पाटील यांच्या घरी छापा टाकला असता बंद घरातील एका खोलीमध्ये 52 पत्त्यावर पैसे लावून हार-जीतचा जुगार खेळतांना आरोपींना रंगेहात पकडले. याप्रकरणी हेमंत उर्फ बजरंग पाटील (46), खासगी शिकवणी वर्ग घेणारे शिक्षक बालू उर्फ शरद ज्ञानेश्वर तळवेकर (47), खरेदी-विक्री संस्थेचे संचालक मुकेश नारायण ढोक (52), संदीप उर्फ बालू गोविंद दुप्पलवार (48), रवी केशव बेलखोडे (40), मंगेश बबन बेलखोडे (38), उमेश मारोतराव नखाते (50) व मनोज ज्ञानेश्वर देवतळे (45) यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाई दरम्यान, यातील आरोपी संदीप दुप्पलवार हा पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला घराच्या छतावर जाऊन पोलिस कर्मचाऱ्याने धावून पकडले तर उमेश नखाते हा सुद्धा घराच्या पूर्वेकडील सुरक्षा भिंत ओलांडून पळ काढत असतांना त्यालाही पोलिसांनी पकडले. शहराच्या मुख्य मार्गावर असलेल्या बजरंग पाटील यांच्या घरी मागील अनेक वर्षांपासून अवैधरीत्या 52 पत्त्याचा लाखो रुपयांचा हार-जितचा जुगार खेळला जात होता. परंतु, आजपर्यंत कोणीही कारवाई केली नाही. परंतु, कर्तव्यदक्ष महिला पोलीस निरीक्षक वंदना सोनूले यांनी ही कारवाई केल्याने त्यांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 5 मोटारसायकलसह एकूण एक लाख 55 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार बंदी कायद्याच्या कलम 4.5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशानुसार ठाणेदार वंदना सोनूले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मनोहर चांदेकर, संजय भगत, संदेश सयाम, शीतल मुन शुभांगी चाफले, सचिन उईके यांनी केली आहे.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज/24 सिंदी रेल्वे