सितादही आधीच कपाशी मोजत आहे शेवटच्या घटका.
🔥 शेतकरी वर्ग चिंतेत
🔥दोन वेच्यातच उलंगवाडीचे चित्र
सिंदी (रेल्वे) (वा): कापूस हे हुकमी व नगदी पीक असल्याने अनेक शेतकरी या पिकाला प्राधान्य देतात. तसेच आता थोडेफार भावही चांगले मिळत असल्याने कपाशीचे पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, यावर्षी कपाशीला पाण्याचा ताण सोसावा लागल्याने कपाशीचे झाडे सोकून जात आहेत. यामुळे उत्पादनात घट येणार असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. सीतादहीनंतर एक-दोन वेच्यातच पहाटी उलंगवाडीवर येत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
परिसरात सोयाबीन व तूर पाठोपाठ शेतकऱ्यांची भिस्त असलेल्या कपाशीवरसुद्धा यावर्षी कमी पावसामुळे कपाशी सोकत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखीनच भर पडली असून, दोन वेच्यातच उलंगवाडीचे चित्र दिसत आहे. यावर्षी कमी पावसामुळे सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. लावलेला खर्चसुद्धा निघत नसून हाता-तोंडाशी आलेला घास हा मातीत गेला आहे. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची चांगल्याप्रकारे मशागत करून महागडे रासायनिक खत, किटकनाशके, वखरणी, डवरणी, निंदन करून कपाशी उभी केली; पण आता पांढरे सोने घरात येण्याच्या दिवसात मात्र सोकून हिरवे पीक पिवळे, लाल पडून सुकण्याच्या मार्गावर आहे. यावर्षी कपाशी या पिकाला सर्वात जास्त खर्च लागला असून मोठं मोठे प्लॉट पिवळे, लाल पडत आहेत. पावसाने दांडी मारल्याने कच्चा माल पूर्णपणे गळून पडून कपाशीला फक्त पालाच दिसत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला असून कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचा सर्व्हे करून त्यांना या संकटातून सावरावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतकऱ्यांच्या आशेवर फिरले पाणी!
यावर्षी कपाशीचे पीक सुरूवातीला जोमदार दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये जास्त उत्पादनाची आशा निर्माण झाली होती. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतकरी थंडीच्या दिवसात पुन्हा माल लागेल, या आशेवर असताना कपाशीवर झालेल्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची निराशा केली आहे.खरीप हंगामाचे वाजले बारा
सोयाबीन पीक हे कापणी आणि काढणीलाही परवडणारे राहीले नाही. यामुळे असंख्य शेतकरी शेतात रोटावेटर फिरवून आता रब्बी हंगामाच्या आशेवर आहेत. काही शेतकरी हार्वेस्टरच्या माध्यमातून तर काही मशीनच्या साहाय्याने सोयाबीनची काढणी करीत आहेत. सोयाबीन शेंगामध्ये ‘बारीकदाणे आहेत. त्यातही खराब दाण्यांचे प्रमाण अधिक असल्याने सोयाबीन उत्पादकांची दाणादाण झाल्याची गंभीर परिस्थिती आहे. कपाशीलासुद्धा बोंड कमीच लागल्याने कपाशी उत्पादकांचीही चिंता वाढली असून यंदाच्या खरीप हंगामाचे बारा वाजले आहे.दिनेश घोडमारे सहासिक न्यूज -24