हिंगणा -/ हैद्राबाद स्टेट गॅझेटियर (सन १९२०) मधील स्पष्ट नोंदींनुसार बंजारा (लांबाडा/सुगळी) समाज हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याचे नमूद आहे. या नोंदींचा आधार घेत महाराष्ट्रातील बंजारा समाजालाही अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गाचा दर्जा मिळावा, अशी ठाम मागणी संत सेवालाल महाराज बंजारा समिती तर्फे करण्यात आली. या मागणीसाठी हिंगणा तहसील कार्यालयात मा. तहसिलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मराठवाडा हा प्रदेश सन १९४८ पर्यंत निजामशाहीच्या हैद्राबाद राज्यात होता. त्या काळातील हैद्राबाद गॅझेटियर (१९२०) मध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तेलंगणा व आंध्र प्रदेशात या पुराव्याच्या आधारे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा व आरक्षणाचे लाभ मिळत आहेत. मात्र महाराष्ट्रात १९५६ नंतर या समाजाला ओबीसी/एनटीसी प्रवर्गात टाकण्यात आले, ज्यामुळे या समाजाला हक्काचे आरक्षण व शैक्षणिक-सामाजिक प्रगतीपासून वंचित राहावे लागत आहे.
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासनाने मराठा समाजासाठी दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी हैद्राबाद गॅझेटियर स्वीकारून त्याची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे शासनाने आधीच गॅझेटियरचा अधिकृत स्वीकार केला असल्याने, त्याच न्यायाने बंजारा समाजालाही अनुसूचित जमाती प्रवर्गाचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावेळी बाबुलाल राठोड (नायक), गणेश जाधव (कारभारी) डॉ. मुरलीमनोहर चव्हाण, सरपंच रामराव राठोड, अविनाश चव्हाण, रोहित राठोड, उल्हास जाधव, कुनाल पवार, विष्णू राठोड, विलास जाधव, बंडू चव्हाण, आकाश जाधव, रवी जाधव, विनोद राठोड, बादल राठोड, अनिल राठोड, गोविंद चव्हाण, चेतन चव्हाण, प्रतीक राठोड , निरंजन जाधव आदींसह हिंगणा तालुक्यातील बंजारा समाजाचे शेकडो महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाच्या या मागणीला आता वेग येत असून, योग्य तो निर्णय न झाल्यास पुढील काळात राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.