65 हजाराची लाच घेताना पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला अटक
प्रतिनिधी / गोंदिया :
गोंदिया जिल्हातील नक्षलग्रस्त भागातील देवरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रमनी मोडक यांना 65 हजारांची लाच स्वीकारताना आज गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना घडली असून ह्या कारवाईमुळे भ्रष्ठ अधिकारी धाबे दणाणले आहेत.
पंचायत समितीचे गटविकासअधिकाऱ्यांविरोधातील तक्रारदार हे एक सहकारी संस्थेचे सदस्य असून त्यांच्या संस्थेमार्फत देवरी तालुक्यात विविध योजना अंतर्गत ग्रामपंचायतींना टेंडर झाल्यानंतर विविध साहित्य पुरविण्याचे काम संस्थेमार्फत केलं जातं. याआधीही तक्रारदारांनी ग्रामपंचायत भागी आणि पिंडकेपार या दोन ग्रामपंचायतींना मनरेगा कामासाठी 38 लाख रुपयाचे साहित्य पुरविले होते. या दोन्ही कामाचे बिल मंजूर करण्यासाठी तक्रारदारांनी 30 हजार रुपयांची लाचही दिली होती.
पुन्हा तक्रारदाराची बिले मंजुरी करीता पाठविण्यासाठी आणि पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत मंजूर झालेल्या कामाकरिता सही करून इस्टीमेट दिल्याच्या मोबदल्यात पुन्हा 65 हजार रुपयांची मागणी आरोपी गटविकास अधिकाऱ्याने केल्याने तक्रारदार यांनी 17 फेब्रूवारी 2022 रोजी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकळे तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यानी संपूर्ण पडताळनी केल्यानंतर पंचासमक्ष आज सापळा रचून 65 हजाराची लाच घेतांना देवरी पंचायत समिती कार्यालयात चंद्रमनी मोडक यांना अटक करण्यात आली. आरोपी विरुद्ध कलम 7 लाच लुचपत प्रतिबंधक कायद्या 1988 नुसार कारवाई करत अटक करण्यात आली आहे. गोंदिया लांच लुचपत विभागा ह्या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत.