🔥नाफेडची हरभरा खरेदी पूर्वसूचना न देता अचानक बंद; सिंदी रेल्वेतील शेतकरी संकटात.
🔥खरेदी क्षमता पूर्ण झाल्याचे कारण; ३१८ शेतकऱ्यांचे शेड्युलिंग रखडले, मुदतवाढीची मागणी
सिंदी (रेल्वे) -/ येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरू असलेल्या शासकीय हरभरा खरेदी केंद्रावर ‘नाफेड’ने (NAFED) कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक खरेदी बंद केली आहे. हरभरा खरेदीची विहित क्षमता पूर्ण झाल्याचे कारण देत पोर्टल बंद करण्यात आल्याने, नोंदणी केलेल्या निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांसमोर आता आपला माल विकायचा कुठे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. या विरोधात बाजार समितीने नाफेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून पोर्टल तात्काळ सुरू करण्याची व मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
🔥पाचशेहून अधिक शेतकरी वाऱ्यावर
बाजार समितीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, केंद्रावर एकूण ६२८ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३१० शेतकऱ्यांचे शेड्युलिंग झाले असले तरी, तब्बल ३१८ शेतकऱ्यांचे शेड्युलिंग अजूनही बाकी आहे. खरेदी प्रक्रिया अचानक थांबवल्यामुळे २८८ क्विंटल मालाची ‘लॉट एन्ट्री’ देखील रखडली आहे. आतापर्यंत केवळ २७० शेतकऱ्यांचा ९,८४५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.
🔥खुल्या बाजारात दराची घसरण
सध्या खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने कोणतीही सूचना न देता अचानक पोर्टल बंद केल्याने ज्या शेतकऱ्यांचे शेड्युलिंग अद्याप झालेले नाही, त्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे.
🔥मुदतवाढ: उर्वरित ३१८ शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी केंद्राला किमान १५ ते २० दिवसांची मुदतवाढ द्यावी.
🔥सुविधा: खरेदी केंद्रावर बारदाना व इतर आवश्यक सुविधांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी.
या संदर्भात बाजार समितीचे सभापती व सचिव यांनी वर्ध्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी आणि विभागीय सहव्यवस्थापक (नागपूर विभाग) यांना निवेदने सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. नाफेडने सकारात्मक निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.