दिव्यांगांच्या हक्कांसाठी बच्चू कडूंचा ऐतिहासिक संघर्ष आणि वर्ध्यातील ‘प्रहार दिव्यांग क्रांती ‘

0

🔥दिव्यांगांच्या हक्कांसाठी बच्चू कडूंचा ऐतिहासिक संघर्ष आणि वर्ध्यातील ‘प्रहार दिव्यांग क्रांती ‘

वर्धा -/ महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर ‘आक्रमक आणि संवेदनशील जननेता’ म्हणून आमदार ओमप्रकाश बाबाराव ऊर्फ बच्चू भाऊ कडू यांचे नाव आदराने घेतले जाते. शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या बच्चू कडू यांनी राज्यातील लाखो दिव्यांग (अपंग) बांधवांच्या आयुष्याला सन्मानाची दिशा दिली आहे. स्वातंत्र्याची अनेक दशके उलटूनही समाजातील सर्वात उपेक्षित राहिलेल्या दिव्यांग घटकाला राजकीय अजेंड्यावर आणण्याचे आणि त्यांच्यासाठी थेट रस्त्यावर उतरून क्रांती घडवण्याचे ऐतिहासिक कार्य आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. हीच संघर्षाची मशाल महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांनी पुनीत झालेल्या ऐतिहासिक वर्धा जिल्ह्यात ‘प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलना’च्या माध्यमातून अत्यंत जोमाने पुढे नेली जात आहे.

बहुतांश राजकीय नेते मंत्रालयातील वातानुकूलित दालनात बसून धोरणे आखत असताना, बच्चू कडू यांनी मात्र दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील तीव्र संघर्षाची वाट निवडली. दिव्यांग बांधवांना ६ हजार रुपयांचे सन्मानजनक मासिक मानधन मिळावे, या मुख्य मागणीसाठी त्यांनी गडचिरोलीच्या दुर्गम भागापासून ते थेट कोकण किनारपट्टीपर्यंत यात्रा’ काढली. या यात्रेने संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांमध्ये एक अभूतपूर्व जागृती निर्माण केली. दिव्यांगांच्या हक्कांच्या लढ्याला केवळ आर्थिक मदत किंवा योजनांपुरते मर्यादित न ठेवता, आमदार बच्चू भाऊ कडू यांनी १९९५ च्या दिव्यांग हक्कांशी संबंधित कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठीही सातत्याने संघर्ष केला. शासनाने कायद्याने दिलेले हक्क प्रत्यक्षात दिव्यांगांपर्यंत पोहोचावेत, राखीव जागा, शिक्षण, रोजगार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ५ टक्के निधी आणि विविध कल्याणकारी योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी त्यांनी राज्यभर असंख्य आंदोलने उभी केली. या संघर्षादरम्यान अनेक वेळा त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, अटक झाली, तरीही त्यांनी आपल्या भूमिकेत कोणतीही तडजोड केली नाही.

दिव्यांगांच्या न्याय्य मागण्यांसाठी बच्चू भाऊंनी अनेक वेळा रक्तदान आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. “आमचे रक्त घ्या; पण दिव्यांगांना त्यांचे हक्क द्या,” हा त्यांचा लढाऊ संदेश संपूर्ण महाराष्ट्रात गाजला. आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब दिव्यांगांच्या हक्कांसाठी अर्पण करण्याची त्यांची तयारी ही केवळ प्रतीकात्मक नव्हती, तर शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडणारी प्रभावी लोकशाही लढाई होती. त्यांच्या या त्याग, संघर्ष आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हजारो दिव्यांगांना न्याय मिळाला आणि शासनालाही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यास भाग पाडले.

केवळ मोर्चेच नव्हे, तर दिव्यांगांच्या रखडलेल्या मागण्यांसाठी त्यांनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी केलेले ‘अन्नत्याग आणि रक्तदान आंदोलन’ तसेच नागपूर हिवाळी अधिवेशनावरील ‘मोर्चा’ आणि मुंबईतील मंत्रालया समोरील आंदोलनांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी शासनाला दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यास भाग पाडले.

बच्चू भाऊंच्या याच आक्रमक विचारांचा वारसा घेऊन वर्धा जिल्हा प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाने स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध अनेक मोठे लढे उभारले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय व झेडपी समोरील ठिय्या आंदोलन: वर्धा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (जिल्हा परिषद, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायती) दिव्यांगांसाठी राखीव असलेला ५% निधी वेळेत खर्च होत नव्हता. या हक्काच्या निधीसाठी ‘प्रहार दिव्यांग क्रांती वर्धा ने जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर आक्रमक ठिय्या आंदोलने करून प्रशासनाला वाकायला लावले.

वर्धा, देवळी, हिंगणघाट, कारंजा, सेलू, आणि आर्वी या तालुक्यांमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे आणि श्रावणबाळ योजनेचे रखडलेले मानधन नियमित करण्यासाठी वा स्थानिक दिव्यांगाच्या समस्यासाठी ‘प्रहार दिव्यांग क्रांति ‘च्या वतीने तहसील कार्यालयांवर धडक मोर्चे काढण्यात आले. आमदार बच्चू भाऊ कडू यांचे दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी कोणतेही आंदोलन असो; मग ते पुणे, नागपूर, मुंबई असो वा देशाची राजधानी दिल्ली, वर्धा जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव भाऊच्या हाकेला प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येक आंदोलनात अत्यंत हिरीरीने आणि मोठ्या संख्येने हजर राहिले आहेत. अगदी दिल्लीच्या महाराष्ट्रसदन वरील आंदोलनापासून ते मुंबईतील आझाद मैदानापर्यंत वर्ध्याच्या दिव्यांग बांधवांनी नेहमीच आपली ताकद दाखवून दिली आहे.

 राज्य शासनाने जेव्हा ‘यूडीआयडी’ (UDID) कार्डच्या सक्तीमुळे दिव्यांगांची पेन्शन रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संपूर्ण वर्धा जिल्ह्यात ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी तहसील स्तरावर तीव्र निदर्शने केली. बच्चू भाऊंच्या राज्यस्तरीय आणि सर्व जिल्हास्तरीय आंदोलनांमुळेच अखेर शासनाला तो जाचक निर्णय मागे घ्यावा लागला.

आमदार बच्चू कडू यांच्या अनेक वर्षांच्या अथक आंदोलनांचे आणि राजकीय पाठपुराव्याचे सर्वात मोठे यश म्हणजे ९ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्रात ‘स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची’ झालेली स्थापना होय. भारताच्या संपूर्ण इतिहासात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. 

या विभागाचे पहिले अभियान अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर बच्चू भाऊंनी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे राज्यव्यापी अभियान राबवले. या अभियानाचा मुख्य उद्देश हा होता की, कोणत्याही दिव्यांगाला शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत. वर्धा जिल्ह्यातही या अभियानांतर्गत आम्ही प्रशासनाला सोबत घेऊन हजारो दिव्यांग बांधवांना त्यांच्या गावात आणि थेट घरापर्यंत पोहोचून जागेवरच अपंगत्व प्रमाणपत्र, ‘यूडीआयडी’ (UDID) कार्ड आणि विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून दिले.

यासोबतच, शासकीय नोकऱ्या आणि योजनांमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे काढून खऱ्या दिव्यांगांचा हक्क हिरावून घेणाऱ्या लाचखोरांवर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कठोर मोहीम त्यांनी राबवली.

बच्चू कडू यांच्या संपूर्ण कारकिर्दीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ‘पदापेक्षा कर्तव्याला’ प्राधान्य देण्याची वृत्ती होय. जानेवारी २०२५ मध्ये, जेव्हा दिव्यांगांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या प्रशासकीय लालफितीत रेंगाळत होत्या, तेव्हा त्यांनी कोणत्याही सत्तेची किंवा पदाची हाव न धरता थेट ‘दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा’ राजीनामा दिला. “पदावर राहून जर मी माझ्या दिव्यांग बांधवांना न्याय देऊ शकत नसेल, तर मला त्या पदाचा मोह नाही मी पुन्हा रस्त्यावर उतरून लढेन,” ही त्यांची भूमिका त्यांच्या प्रामाणिकपणाची साक्ष देते. राजीनाम्यानंतरही त्यांनी दिव्यांग शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी आणि सार्वजनिक वाहतुकीत दिव्यांगांना विशेष सवलती मिळवण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवणे सुरूच ठेवले आहे. 

थोडक्यात सांगायचे तर, आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगांकडे कधीही ‘कीव’ किंवा ‘दया’ म्हणून पाहिले नाही, तर त्यांना त्यांचे ‘हक्क’ आणि ‘अधिकार’ मिळवून दिले आहेत. शरीराने अपंग असलेल्या पण मनाने उंच झेप घेण्याची जिद्द बाळगणाऱ्या प्रत्येक दिव्यांग बांधवाला त्यांनी आत्मविश्वासाची नवी ताकद दिली आहे. म्हणूनच, महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय इतिहासात जेव्हा जेव्हा दिव्यांगांच्या कल्याणाचा आणि हक्कांच्या संघर्षाचा उल्लेख होईल, तेव्हा आमदार बच्चू भाऊ कडू यांचे नाव अग्रक्रमाने आणि सुवर्णअक्षरांनी घेतले जाईल. ही केवळ राजकीय किंवा संघटनात्मक मांडणी नाही. आमदार बच्चू भाऊ कडू यांची दिव्यांगांविषयी असलेली तळमळ, त्यांचा निःस्वार्थ संघर्ष, आंदोलनातील जिद्द आणि प्रत्येक दिव्यांगाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेली धडपड मी संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने अत्यंत जवळून अनुभवली आहे. अनेक आंदोलने, बैठका, रक्तदान आंदोलन, प्रशासनाशी केलेला संघर्ष आणि दिव्यांग बांधवांच्या डोळ्यांतील आशेचा किरण मी स्वतः पाहिला आहे. म्हणूनच हा लेख लिहावासा वाटला. हा लेख एखाद्या व्यक्तीची स्तुती करण्यासाठी नसून, दिव्यांगांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचलेल्या एका लढवय्या नेतृत्वाच्या कार्याची वस्तुनिष्ठ नोंद म्हणून मी मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रमोद कुऱ्हाटकर(जिल्हाध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन, वर्धा)

       ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!